हॉटेल व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

दामदुप्पट परताव्याचे आमिष : सुमारे दहा जणांची फसवणूक 

औरंगाबाद - समूहात व्यावसायिक गुंतवणूक केल्यास नऊ महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून उद्योजकांनी तीन कोटी 29 लाख 66 हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 22) ऑगस्टला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नितीन रामकृष्ण शेळके, सत्यकुमार रामकृष्ण शेळके अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी हर्षल कैलासराव झरेकर (32, रा. गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिली. त्यांच्यासह सुमारे नऊजणांची फसवणूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हॉटेल व्यावसायिक हर्षल कैलासराव झरेकर यांची बीडबायपास रोडवर ढाबा जंक्‍शन हॉटेल आहे. झरेकर 2017 मध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये होते. ऑगस्ट 2018 मध्ये अभिजित हिवाळे यांच्यासोबत असताना कुबेर अव्हेन्यू कॉम्प्लेक्‍समधील नित्य सेवा सर्व्हिसेस या दुकानात नितीन शेळके आणि सत्यकुमार शेळके या बंधूंशी त्यांची ओळख झाली. त्यावेळी नितीन शेळके यांनी त्यांच्या शेळके उद्योग समूहाबाबत झरेकर यांना माहिती दिली. नित्यसेवा सर्व्हिस, उडपी गोविंदम हॉटेल, एस. आर. कन्स्ट्रक्‍शन अशा त्यांच्या व्यवसायांची नावेही सांगितली.

यात गुंतवणूक केल्यास नऊ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देऊ असे आमिष झरेकर यांना त्यांनी दाखवले. यावर विश्‍वास ठेवून 28 सप्टेंबर 2018 ला झरेकर यांनी दोन लाख रुपये नितीन शेळके यांच्या कार्यालयात जमा केले. त्यानंतर नेफ्ट व आयएमपीएस खात्यावर झरेकर यांच्याकडून 28 सप्टेंबर 2018 ते 31 मार्च 2019 दरम्यान खात्यात 35 लाख दोन हजार तसेच सप्टेंबर 2018 ते 12 एप्रिल 2019 दरम्यान रोख 67 लाख 13 हजार 999 रुपये असे एकूण एक कोटी दोन लाख 15 हजार 999 रुपये दिले. तसेच त्यांच्या वडिलांनीही 14 लाख 50 हजार नेफ्टद्वारे गुंतवले. या रकमेची सुरक्षा म्हणून नितीन शेळके याने पाच लाखांचा धनादेश दिला; मात्र तो बॅंकेत वटला नाही. झरेकर यांच्यासह इतरांनीही शेळके समूहात गुंतवणूक केली. त्यांची गुंतवणुकीची रक्कम एक कोटी 86 लाख रुपये एवढी आहे. सर्व गुंतवणूक मिळून तीन कोटी 29 लाख 65 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याचे झरेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 accused in financial fraud case