ऊसतोडीसाठी शंभर कुटुंबाचे झाले स्‍थलांतर

ऊसतोडीसाठी शंभर कुटुंबाचे झाले स्‍थलांतर

वारंगाफाटा : कळमनुरी तालुक्‍यातील कुंभारवाडी, उमरदरा येथील शंभर कुंटूंबे मुलाबाळासह कर्नाटकातील फैजाबाद येथे ऊसतोड कामासाठी स्‍थलांतरीत झाल्याने गाव ओस पडले असून ही घरे कुलुप बंद झाली आहेत. दिवाळीचा सण देखील या कुंटूंबीयांनी कामाच्या ठिकाणीच साजरा केला आहे. 

कळमनुरी तालुक्‍यातील कुंभारवाडी, उमरदरा ही गावे वारंगाफाटा येथून चार ते पाच किलोमिटर अंतरावर असून आदीवासी बहुल गावे आहेत. दोन्ही गावची लोकसंख्या 1600 तर 250 घरांची संख्या आहे. या दोन्हीही गावात पन्नास टक्‍के नागरीक अल्‍पभुधारक शेतकरी आहेत. तर इतर रोजमजुरी करतात. यातील बहुतांश पुरुष मंडळी वारंगा व बाळापूर येथे हमालीचा व्यवसाय करतात. तर महिला परिसरातील गावात शेतातील मंजुरीची कामे करतात. 

वारंगा, डोंगरकडा, तोंडापूर आदी गावात महिला कामासाठी जातात. यावर्षी झालेल्या अत्‍यल्‍प पावसाने खरीप हाताचा गेल्याने मजुरीची कामे मिळालीच नाहीत. तसेच हमाली करणाऱ्यांना देखील कामे मिळत नसल्याने दसऱ्या पासूनच या दोन्ही गावातील शंभर कुंटूंब ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यातील फैजाबाद येथे गेले आहेत. अनेकाची मुले गावातील जिल्‍हा परिषदेच्या शाळेत आहेत. तर काही मुले आदीवासी आश्रमशाळेत शिक्षण घेतात. 

आश्रमशाळेतील मुले गावात नातेवाईकाडे थांबली आहेत. तर जिल्‍हा परिषद शाळेत असणारी मुले या कुंटूंबीयानी सोबत नेली आहेत. गावात कोणतेही रोजगाराचे साधन नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने बहुतांश कुंटूंबानी स्‍थलांतराचा मार्ग अवलंबविला असल्याचे येथील रामदास खोकले, शिवाजी डाखुरे,आप्पाराव लाखाडे यांनी सांगितले. 

ऊसतोडीची कामे संपेपर्यत गावात न येण्याचा निर्णय या कुंटूंबीयानी घेतला आहे. दसऱ्यापासून ते गाव सोडून गेल्याने दिवाळीचा सण देखील कामाच्या ठिकाणीच साजरा करावा लागल्याचे शेषराव बर्गे, बबन खोकले यांनी सांगितले. गावात व परिसरात रोजगाराची कामे मिळत नसल्याने स्‍थलांतर करावे लागल्याचे गावातील नागरीक सांगतात. स्‍थलांतरीत झालेल्यात तरुण मंडळीचा समावेश सर्वाधीक आहे. गावात वयोवृध्द मंडळी थांबलेली आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com