परभणी जिल्ह्यात संभाव्य पॅनल प्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात

विनोद पाचपिल्ले
Tuesday, 15 December 2020

जिंतूर तालुक्यात १७० गावे असून ४७ तांडे व जवळपास ३० वाडी-वस्ती आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेती हेच असल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील मजूरवर्ग कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, सुरत या भागामध्ये जातात. तालुक्यातील जवळपास २९ हजार मजूर वर्ग कामासाठी बाहेरगावी होता, परंतु आठ महिन्यात कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागल्याने हे मजूर मूळगावी परतले होते. 

जिंतूर ( परभणी) : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यातील ४७ तांडे व ३० वाडी-वस्तीवरील जवळपास २९ हजार मतदार  स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत निवडणुकीत स्थलांतरित मतदाराच्या शोधात पॅनलप्रमुख लागले आहेत.

जिंतूर तालुक्यात १७० गावे असून ४७ तांडे व जवळपास ३० वाडी-वस्ती आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेती हेच असल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील मजूरवर्ग कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, सुरत या भागामध्ये जातात. तालुक्यातील जवळपास २९ हजार मजूर वर्ग कामासाठी बाहेरगावी होता, परंतु आठ महिन्यात कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागल्याने हे मजूर मूळगावी परतले होते. 

हे ही वाचा : हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाची दमछाक

परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हे मजूर परत ऊसतोड व कामाच्या शोधात मूळ गाव सोडून गेले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक लागल्याने पुन्हा एकदा त्यांना मतदान करण्यासाठी मूळगावी यावे लागणार आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार या सर्कलमध्ये जवळपास १३ तांडे असून आडगाव तांडा, सोरजा तांडा, भूसकवडीतांडा, मोहखेडतांडा, गडदगव्हाणताडा, इटोलीतांडा, खोलगाडगातांडा, गणेश नगरतांडा, सावळीतांडा आदी तांड्याचा समावेश आहे. या तांड्यातील जवळपास सहा ते सात हजार कामगार कामाच्या शोधासाठी बाहेर गेलेली आहेत.

चारठाणा सर्कलमध्ये बारा तांडे आहेत. गारखेडातांडा, राजेगावतांडा, जामतांडा, सायखेडातांडा, हलविरातांडा, चारठाणा तांडा यासह १२ ते १३ तांडे आहेत. या सर्कलमधून साधारण साडेतीन हजार ते चार हजार मजूर वर्ग बाहेरगावी होता. वझर सर्कलमध्ये १२ तांडे असून हंडीतांडा, असोलातांडा, कवठातांडा, सायखेडातांडा, कोरवाडी तांडा, नव्हतीतांडा, कोठातांडा, सावरगाव तांडा, ब्राह्मणगाव तांडा यांचा समावेश आहे. या तांड्यातून जवळपास तीन हजारपेक्षा जास्त मजूर वर्ग बाहेरगावी कामासाठी गेलेले आहेत

हे ही वाचा : मराठवाड्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भोगाव सर्कलमध्ये घेवडातांडा, पोखरणीतांडा, खरदडी तांडा, चितनरवाडीतांडा, वडधूतीतांडा, तेलवाडी तांडा, जुनंनवाडी तांडा असे सात तांडे आहेत. यातून जवळपास एक हजार लोक बाहेरगावी आहेत. सावंगी म्हाळसा या सर्कलमध्ये सात तांडे असून यात विजयनगर तांडा, केहाळ तांडा, जोगी तांडा, चव्हालीतांडा, अंगलगाव तांडा, संक्राळा तांडा, अंबरवाडी तांडा यांचा समावेश असून यातून दीड ते दोन हजार कामगार बाहेरगावी आहेत. बोरी सर्कलमधून साधारणतः तीन हजार कामगारवर्ग बाहेरगावी असून हीच परिस्थिती वसा सर्कलची आहे. वसा सर्कलमध्ये साधारणतः चार ते पाच हजार कामगार वर्ग बाहेरगावी आहे. कौसडी सर्कलमधून एक हजार लोक बाहेरगावी असून वरुड सर्कलमध्ये अडीच ते तीन हजार रुपये बाहेरगावी आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 101 Gram Panchayat elections in Jintur taluka the panel heads have started searching for the migrant voters