परभणी जिल्ह्याच्या सीमेवर ११ लाखाची रोकड जप्त

गणेश पांडे
Monday, 4 May 2020

कोरोना विषाणु संसर्गामुळे जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या चारही बाजूने चेकपोस्ट उभ्या केल्या आहेत. या चेकपोस्टवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तसेच त्यात बसलेल्या लोकांची चौकशी करून त्यांना आता सोडले जात आहे.

परभणी : जिल्ह्यात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या एका महागड्या कारसह तब्बल ११ लाख ३० हजारांची रोकड जिल्ह्याच्या सीमेवर तैनात असणाऱ्या पोलिसांनी रविवारी (ता.तीन) रात्री पकडली. दरम्यान, कार चालक हा सेलू शहरातील शास्त्री नगरमधील रहिवाशी आहे.

कोरोना विषाणु संसर्गामुळे जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या चारही बाजूने चेकपोस्ट उभ्या केल्या आहेत. या चेकपोस्टवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तसेच त्यात बसलेल्या लोकांची चौकशी करून त्यांना आता सोडले जात आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा रस्त्यावर चेक पोस्ट आहे. या चेकपोस्टवर रविवारी (ता. तीन) रात्री एक निसान कार (क्र.एमएच १२ एम.बी. ९९४९) ही भरधाव वेगाने जिल्हयात प्रवेश करत होती. तेथे कर्तव्यावर हजर असलेले परिविक्षाधिन फौजदार अजय माधवराव पाटील (नेमणुक नवामोंढा पोलिस ठाणे, परभणी) यांनी सदर कारला थांबविले. 

हेही वाचा - परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

कार चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने अक्षय अशोकचंद भंडारी (वय ३०, रा. शास्त्रीनगर, सेलू) असे सांगितले. त्यास जिल्हा प्रवेशाचा पास आहे का? याची विचारणा केली असता त्याने आपल्याकडे कोणताही पास नसल्याचे सांगितले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात पैसे आढळून आले. या पैश्या संदर्भात कार चालक अक्षय भंडारी कोणतीही माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर रक्कम जप्त करून त्यानंतर पोलिसांनी सदर कारचा पंचनामा केला. सदर कार ही चारठाणा पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे. 

चारठाणा पोलिस ठाण्यामध्ये कार आणल्यानंतर त्यातील पैश्यांची मोजदाद केली असता ही रक्कम ११ लाख ३० हजार रुपये भरली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. कार व रोख रक्कम मिळून १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

येथे क्लिक करा - Video : परभणीचे ‘हे’ गाडगेबाबा देतात स्वच्छतेचा संदेश

या प्रकरणी जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्या प्रकरणी तसेच बेकायदेशिररित्या रोख रक्कम बाळगल्या प्रकरणी अक्षय भंडारी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई फौजदार अजय पाटील यांच्यासह कृषी कार्यालयाचे लिपिक एम.एम.खोतकर, पोलिस कर्मचारी के.बी.हराळ, आरोग्य सेवक जि.बी. नवले, पोलिस कर्मचारी ए.एन.तोडेवाड, एस.पी.गजभारे, एम.व्ही. शेळके यांनी मिळून केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 Lakh Cash Seized At Parbhani District Border Parbhani News