कलेच्या छंदातून १२ लघुपटाची निर्मिती

राजेश दारव्‍हेकर
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

- बासंबा येथील पवनकुमार वानखेडे
- फोटोग्राफी व्यवसायाने बनविले दिग्दर्शक

 

हिंगोली : हिंगोली तालुक्‍यातील बासंबा येथील एका तरुणाने ‘व्यसनमुक्‍ती’, ‘घरकुल एक सपन’, ‘संक्रमीत डास’ आदी विषयांवर बारा लघुचित्रपट तयार करून युट्युबर प्रसारीत केले आहेत. स्‍थानिक कलावंतांनी यात भूमिका साकारल्या आहेत. या तरुणाचे पवनकुमार वानखेडे नाव असून त्याने शाळा, महाविद्यालयातील सांस्कृतीक कार्यक्रमात विविध भूमिका साकारल्या होत्या. यातूनच त्याला लघुचित्रपट तयार करण्याची कल्पना सुचली आहे.

हिंगोली तालुक्‍यातील बांसबा येथील पवनकुमार वानखेडे याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने गावातच फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. हे काम करीत असताना त्‍याच्याकडे असलेल्या व्हीडीओ कॅमेऱ्यातून त्‍याने निसर्गचित्र, स्‍थिरचित्र, यासह विविध पिके यांची छायाचित्रे टिपली आहेत. तसेच त्यांनी व्हिडीओ शुटींगच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यास सुरवात केली. त्‍यानंतर त्‍याला लघुपट तयार करण्याची कल्‍पना सूचली. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सांस्‍कृतीक कार्यक्रमांतून त्याने पारितोषिके मिळविली आहेत. युवक महोत्‍सवात नृत्य स्‍पर्धेत यश मिळविले.

दरम्यान, त्‍याची ओळख रघुनाथ घुगे या लघुचित्रपट दिग्दर्शकासोबत झाली. त्‍यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘हिंद वादळ’ या चित्रपटात कलाकाराची भूमिका दिली. ही भूमिका पवनकुमार याने यशस्‍वी वठविली. त्‍याच्यातील कलाकार जागा झाला. त्‍याने स्‍वतःच लघुचित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्‍याप्रमाणे ऑनलाईन माहिती घेत समाजातील विविध विषय हाताळण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘घरकुल एक सपन’, ‘संक्रमीत डास’ ‘बेरोजगारी’, ‘निराधाराचे प्रश्न’, ‘शिक्षण’, ‘व्यसनमुक्‍ती’, ‘स्‍वच्‍छता अभियान’ आदी बारा विषयांवर लघुचित्रपट तयार करून युट्युबवर प्रदर्शीत केले आहेत. या चित्रपटामध्ये स्‍थानिक कलाकार पुजा मस्‍के, मारोती हनवते, अक्षय नागरे, राम देवकर, अनिल शिंदे, सावनकर, वाघमारे यांनी भूमिका साकारल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 short films Production from hobby