Breaking : लातूर जिल्ह्यात या तारखेपासून १५ दिवस कडक लॉकडाउन

हरी तुगावकर
Sunday, 12 July 2020

पालकमंत्री अमित देशमुख यांची घोषणा; दारूची दुकान आजपासून बंद 

लातूर : जिल्ह्यात वाढत चाललेला कोविड १९ प्रादुर्भाव लक्षात घेता ता. १५ ते ३० जुलै या कालावधित पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे, अशी घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.१२) येथे केली आहे. त्यानंतर या संदर्भातील अधिक तपशीलाची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये दिली. लॉकडाउन ता. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असला तरी सोमवारपासून (ता. १३) जिल्ह्यातील सर्व वाइनशॉप, बीयरबार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

जिल्ह्यात कोरोनाचे साडेसहाशे पेक्षा अधिक रुग्ण आहेत. ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, लोकप्रतिनिधीसोबतच जनतेतूनही लॉकडाउनची मागणी होत होती. त्या अनुषंगाने श्री. देशमुख यांनी रविवारी लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी फेसबुक लाइव्हमध्ये याची माहिती दिली. शिवाय या लॉकडाउनच्या काळात काय बंद राहील व काय सुरू राहील याची सविस्तर माहिती सोमवारी (ता. १३) सायंकाळपर्यंत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची तर गंगाखेडला १९ जूलैपर्यंत संचारबंदी...
  
तीन दिवस सर्व व्यवहार सुरळीत 
लॉकडाऊन सुरू होण्यास तीन दिवस आहेत. सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत. विनाकारण नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूचे व्यवहार सुरूच राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहनही जिल्ह्याधिकाऱ्यांनी केले. 

रभणीला धक्का : गंगाखेड शहरात २४ तासात २० कोरोनाग्रस्त
 
स्वॅबसाठी जाणार घरोघरी 
हा लॉकडाऊन कडक असणार आहे. पण, या कालावधित घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार आहे. इतकेच नव्हे तर स्वॅब देण्यासाठी नागरिकांना क्वारंटाइन कक्षात जाण्याची गरज नाही. घरोघरी जाऊन स्वॅब घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जी. श्रीकांत यांनी यावेळी दिली.

(संपादन : विकास देशमुख) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 Days Lockdown in Latur District