दीड लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य विम्याचे कवच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

लातूर - दारिद्य्ररेषेखालील गरजू कुटुंबांना पाच लाख रुपये खर्चापर्यंतचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन (आयुष्यमान भारत) योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत कुटुंबांना पाच लाखांचे आरोग्य विमाचे कवच देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार कुटुंबांची निवड करण्यात आली असून, या कुटुंबांतील सदस्य व अन्य माहिती येत्या चार दिवसांत अद्ययावत (अपडेट) करण्यात येणार आहे. त्यानंतर या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ मिशनचा लाभ देण्याबाबत निर्णय होणार आहे. 

कुटुंबांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित कुटुंबांनी त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी केले आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना हाती घेतली आहे. या योजनेत गरजू कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतची आरोग्य विमा सुरक्षा देण्यात येणार आहे. योजनेशी संलग्नित सरकारी व खासगी रुग्णालयांत कुटुंबांतील सदस्यांना पाच लाख रुपये खर्चापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने वर्ष २०११ मध्ये केलेल्या सामाजिक जातीय जनगणनेनुसार लाभार्थींची निवड केली असून त्यांच्या याद्या जिल्हापातळीवर अद्ययावत करण्यासाठी पाठविल्या आहेत.

त्यानुसार आशा व आरोग्य कर्मचारी प्रत्येक कुटुंबांना भेट देऊन कुटुंबांची माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदेने या याद्यांचे ३० एप्रिल रोजी जिल्ह्यात घेतलेल्या ग्रामसभेत वाचन केले असून येत्या चार दिवसांत अद्ययावत तसेच अतिरिक्त माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबांची जबाबदारी देण्यात आली असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले. या मोहिमेत संबंधित कुटुंबाची वास्तव्याची सद्यःस्थिती, कुटुंबप्रमुखांचा मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक व कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे ही कामे वेगाने सुरू झाल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले.

Web Title: 1.5 lakh family health security insurance by ayushman bharat yojana