मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी १५४ उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा   

dow
dow

परभणी ः परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ संचालक पदाच्या निवडणूकीसाठी विविध मतदार संघातून अखेरच्या दिवसापर्यंत सोमवारी (ता.२२) एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी सोमवारी १०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मंगळवारी (ता.२३) तालुकानिहाय अर्जांची छानणी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी पत्रकान्वये दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकवटल्याचे चित्र असून महाविकास आघाडीविरुध्द अन्य अशा लढती रंगणार असल्याचे तसेच काही पारंपरिक मातब्बरांच्या जागा बिनविरोध होण्याचे संकेत मिळत आहेत. 

धान्य अधिकोष मतदार संघातून ८९ अर्ज
जिल्हा बॅंकेच्या २१ जागांसाठी १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी व धान्य अधिकोष मतदार संघातून ८९ अर्ज, कृषी पणन संस्था मतदार संघातून सहा, इतर शेती संस्था मतदार संघातून १३, महिला राखीव मतदार संघातून १५, अनुसूचित जाती, जमाती मतदार संघातून १०, इतर मागास वर्ग मतदार संघातून सात व विमुक्त जाती/भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग मतदार संघासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

यांनी दाखल केले अर्ज 
सोमवारी तिन्ही माजी अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद कदम बोर्डीकर, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासह साहेबराव पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आनंद भरोसे, विजय जामकर, भगवान वाघमारे, स्वराजसिंह परिहार, शशिकांत रामराव वडकुते, अंजली रविंद्र देशमुख, समशेर वरपुडकर, प्रेरणा वरपुडकर, भावना रामप्रसाद कदम, गणेशराव रोकडे, करुणाबाई बालासाहेब कुंडगीर, प्रशास ठाकुर, अतुल सरोदे, सुशिल मानखेडकर, सविता सुनिल नादरे, बालासाहेब देसाई, मनिष आखरे, रुपाली राजेश पाटील, सरस्वती दशरथ भोसले, डॉ.सिध्दार्थ भालेराव, सुरेश गिरी, संजय राठोड, नारायण पिसाळ, द्वारकाबाई कांबळे यांच्यासह अन्य उमेदवारांचे १०१ अर्ज दाखल झाले आहेत. 
 
महाविकास आघाडी विरुध्द अन्य 
बँकेची निवडणूक पक्षीय चिन्हांवर लढवली जात नसली तरी येथे राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रितरित्या निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. सोमवारी बॅंकेचे माजी अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार विजय भांबळे या नेते, उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द अन्य अशी लढत रंगणार असल्याचे बोलले जात आहे. 

नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता.२२) अलोट गर्दी उसळली. नेते, कार्यकर्ते, उमेदवार, समर्थकांच्या रेटारेटीत सोशल डिस्टंन्सींगचा अक्षरशः फज्जा उडाला. शासन, प्रशासन एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकावर एक निर्बंध लावीत असताना इथे मात्र कोरोना सुरक्षि नियमांची वाट लागली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या परिसरात असलेल्या शेतकी भवण येथे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांचे निवडणूक कार्यालय असून सोमवारी (ता.२२) अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेते, उमेदवारांसह हजारो मतदार, कार्यकर्त्यांची गर्दी उसळळी.

बॅंकेच्या आवारात तुफान गर्दी 
सोमवारी दुपारी तीनपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालय परिसरात तुफान गर्दी होती. त्यामुळे सुरक्षीत अंतराचा तर फज्जा उडालाच परंतू, अनेकांना मुखपट्टीचा देखील विसर पडलेला होता. कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेटारेटीत नेत्त्यासह उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याचे चित्र होते. निवडणूक विभागाच्या वतीने येथे हॅन्डसॅनिटायझर, मास्कची देखील व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी कर्मचारी देखील नियुक्त केले होते. परंतू, उत्साही कार्यकर्ते व मातब्बर पुढाऱ्यांपुढे या कर्मचाऱ्यांची त्यांना मास्क देण्याची, हॅन्ड सॅनिटायझर टाकण्याची हिंमत झाली नाही. निवडणूक कार्यालय देखील तोकड्या जागेत आहे. तेथेच विविध मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेगवेगळे टेबल आहेत. अधिकाऱ्यांचा देखील तेथेच टेबल आहे. एक उमेदवार व त्यांचे सुचक, अनुमोदकांनाच आतमध्ये सोडणे अपेक्षित असताना तिथे मात्र मर्यादीत संख्या ठेवण्यासाठी कोणतीही खबरदार घेतल्या गेली नसल्याचे चित्र होते. 


संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com