१.६३ लाख कार्डधारकांचे रॉकेल केले कपात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मागणीमध्ये ६.२४ लाख लिटरची घट, आधारकार्ड लिंकिंग केले नाही

बीड - शासनाच्या निर्देशानुसार एक गॅस अथवा दोन गॅस सीलिंडर असणाऱ्या कार्डधारकांचे रॉकेल नियतन यापूर्वीच पुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ५ लाख कार्डधारकांनाच रॉकेलचे वाटप केले जात आहे. शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांचे कार्ड हे आधार क्रमांकाशी लिंक करून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत; मात्र गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करूनही आतापर्यंत ३ लाख ३६ हजार ६६४ कार्डधारकांनीच आधार क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.

अद्यापही १.६३ लक्ष कार्डधारकांनी आधार क्रमांक उपलब्ध करून न दिल्यामुळे पुरवठा विभागाने या कार्डधारकांच्या वाट्याचे ६.२४ लाख लीटर रॉकेल कपात केले असून, शासनाकडे कमी रॉकेल कोट्याची मागणी केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी दिली.

बीड जिल्ह्यात ७ लाख ८ हजार ५३३ शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. यातील २ लाख ८ हजार ६४८ कार्डधारकांकडे गॅसजोडणी असल्याने शासनाने त्यांचे रॉकेल नियतन शासनाच्या आदेशानुसार पुरवठा विभागाने रद्द केलेले आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून ५ लाख ३७८ कार्डधारकांना प्रत्येक महिन्याला १९ लाख २० हजार लीटर रॉकेल वाटप केले जाते. शासनाने गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस शिधापत्रिकाधारकांची संख्या कमी करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचे कार्ड हे त्यांच्या आधारकार्ड क्रमांकाशी लिंक करून घेण्याची मोहीम सुरू केलेली आहे; मात्र शासनाच्या निर्देशानंतर पुरवठा विभागाकडून वारंवार पाठपुरावा करूनही जिल्ह्यातील ५ लाख ३७८ कार्डधारकांपैकी ३ लाख ३६ हजार ६६४ कार्डधारकांनीच आधार क्रमांक उपलब्ध करून दिले. तर वर्षभरापासून अद्यापपर्यंत तब्बल १ लाख ६३ हजार ७१४ कार्डधारकांनी आपले आधारकार्ड क्रमांकच उपलब्ध न करून दिल्यामुळे हे कार्डधारक बोगस आहेत की काय? अशी शंका उपस्थित करून सदर कार्डधारकांचे तब्बल ६ लाख २४ हजार लीटर रॉकेल कपात करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा विभागाने केली आहे. या कारवाईनुसार प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील कार्डधारकांसाठी १९ लाख २० हजार लीटर रॉकेलची मागणी केली जात असताना जानेवारी महिन्यासाठी मात्र पुरवठा विभागाने केवळ १२ लाख ९६ हजार लीटर रॉकेल कोट्याची मागणी शासनाकडे केली आहे. दर महिन्याच्या मागणीच्या तुलनेत ६ लाख २४ हजार लीटरने रॉकेल कोट्याची मागणी कमी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याकरिता आधारकार्ड क्रमांक न देणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना रॉकेलपासून वंचित राहावे लागणार आहे.

शासनाकडे जानेवारी महिन्यासाठी सव्वासहा लाख लिटर रॉकेलची कमी मागणी करण्यात आली आहे. शासनाकडे रॉकेल कोट्याची मागणी नोंदविताना आधार क्रमांक उपलब्ध न करून देणाऱ्या कार्डधारकांच्या रॉकेलचा या वेळी विचार करण्यात आलेला नाही. या कार्डधारकांनी आगामी काळात आपले आधार क्रमांक उपलब्ध करून दिल्यास रॉकेल मागणी पुढच्या वेळी वाढविण्यात येईल. आधारकार्ड शिधापत्रिकेशी लिंक करण्याच्या मोहिमेमुळे बोगस कार्डधारकांना आळा बसणार आहे.- संतोष राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: 1.63 lakh card holder kerosene reducation