esakal | हिंगोलीत १८ जवानांनी जिंकले ‘कोरोना युद्ध’
sakal

बोलून बातमी शोधा

home

हिंगोली जिल्ह्यात सलग दोन दिवस नागरिकांना दिलासा देणारे ठरले आहेत. सोमवारी १५ जवान, तर मंगळवारी १८ एसआरपीएफ जवानांनी कोरोनावर मात केली आहे.    

हिंगोलीत १८ जवानांनी जिंकले ‘कोरोना युद्ध’

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः मुंबई व मालेगाव येथून बंदोबस्‍तावरून आलेल्या एसआरपीएफच्या १८ जवानांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्याने त्‍यांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे जिल्‍ह्यातील रुग्णसंख्येत घट झाली असून सध्या ५३ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली.
 
जिल्ह्यात यापूर्वी तीन व सोमवारी १७ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी १८ जवान कोरोनामुक्‍त झाले आहेत. जिल्‍ह्यात एकूण ९१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी यातील १५ जवान व अन्य पाचजण, असे २० जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी परत १८ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. आतापर्यंत ३८ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. सध्या ५३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून यामध्ये ५१ जवानांचा समावेश आहे. यातील नऊ जवानांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत, उर्वरित दोन रुग्णांमध्ये एक सेनगाव येथील, तर जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील एक परिचारिकेचा समावेश आहे. 

हेही वाचा - गावी परतल्याच्या आनंदाने मजूर गहिवरले... 

अहवालानंतर जिल्‍ह्यात समाधान
हिंगोली येथील १८ जवान कोरोनामुक्‍त जवानांना सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीबास व वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी दिली. त्‍या वेळी जिल्‍हा समादेशक मंचक इप्पर, डॉ. कदम, डॉ. दीपक मोरे आदींची उपस्‍थिती होती. मागच्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येत असल्याने जिल्‍ह्यात समाधानाचे वातावरण आहे.

हेही वाचा - मोंढा गजबजला हळद, हरभऱ्याची आवक वाढल्याने...  

सोमवारी १५ जण कोरोनामुक्‍त
हिंगोली ः मालेगाव व मुंबई येथील बंदोबस्‍त आटोपून परतल्यावर कोरोनाबाधित झालेल्या ८४ जवानांपैकी सोमवारी (ता. ११) हिंगोलीतील ११, तर औरंगाबाद येथील दोन, असे १३ जवान व अन्य चार, असे एकूण १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यापैकी हिंगोलीतील पंधराजणांना सोमवारी सुटी देण्यात आली. आजपर्यंत एकूण २० जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्‍हा शल्यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. हिंगोली येथील राज्य राखीव दलातील १९४ अधिकारी व कर्मचारी मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्‍ताचा कालावधी संपल्यावर परत आले होते. त्‍यापैकी हिंगोलीचे ८३ व जालना येथील एक, अशा ८४ जवानांना कोरोनाची लागण झाली. 


हिंगोली जिल्ह्याची कोरोनामुक्त माहिती
- हिंगोलीत मंगळवारी १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्‍त
- जिल्‍ह्यात एकूण ९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
- आता एकूण ५३ रुग्णांवर उपचार सुरू, यामध्ये ५१ जवान, तर अन्य दोनजण
- यापूर्वी २० जण कोरोनामुक्‍त, तर आजचे १८, असे ३८ कोरोनामुक्‍त
- नऊ जवानांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू