अबब! १८ हजार नव्या मालमत्ता आढळल्या

Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

औरंगाबाद - महापालिकेने शहरातील एक लाख १२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून, त्यात आतापर्यंत १८ हजार ५७५ नव्या मालमत्ता आढळून आल्या आहेत. दुसरीकडे थकीत मालमत्ता करवसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. रोज ९० मालमत्ता जप्त झाल्या पाहिजेत, अशी तंबी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना महापालिकेच्या दप्तरी मात्र मालमत्तांची संख्या कासवगतीने वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्तांचे सर्वेक्षणही झाले नव्हते. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रभागनिहाय पथके तयार करून मालमत्तांच्या नोंदी घेण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत एक लाख १२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती महापौरांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. यातील १८ हजार मालमत्तांना यापूर्वी कर लागलेला नाही. ही बाब समोर आल्यानंतर आता कर आकारणी केली जात आहे. बैठकीला सभागृह नेते विकास जैन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, मुख्य कर निर्धारक व संकलक महावीर पाटणी, सहायक जयंत खरवडकर यांची उपस्थिती होती. 

वसुली केवळ १९.३१ टक्के 
मालमत्ता करापोटी यंदा ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ८६ कोटी ९२ लाख रुपये जमा झाले आहेत. त्याची आकडेवारी १९.३१ टक्के एवढी आहे. पाणीपट्टीपोटी १८ कोटी ५९ लाख रुपयांचा नागरिकांनी भरणा केला आहे. म्हणावी तशी वसुली होत नसल्यामुळे महापौरांनी रोज प्रत्येक प्रभागात किमान १० जप्तीच्या कारवाया झाल्या पाहिजेत, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दहा लाखांची वसुली
औरंगाबाद - महापालिकेने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी (ता. पाच) नऊ प्रभागांत अकरा मालमत्तांना सील ठोकत दहा मालमत्ताधारकांकडून दहा लाख पन्नास हजार रुपयांचा कर वसूल केला.

मंगळवारी वॉर्ड क्रमांक एक कार्यालयांतर्गत काकासाहेब पंढुरे यांच्याकडे दोन लाख रुपयांचा कर थकल्याने कार्यालय सील करण्यात आले. यावेळी दोन मालमत्ताधारकांनी ७५ हजार रुपयांचा थकीत कर भरला. वॉर्ड क्रमांक दोन कार्यालयांतर्गत तीन मालमत्ताधारकांकडून एक लाख ४५ हजार रुपयांचा थकीत कर वसूल करण्यात आला. वॉर्ड क्रमांक- पाच कार्यालयांतर्गत जाधववाडी परिसरातील पारसमल रवींद्रकुमार, मालपाणी अँड ब्रदर्स, लक्ष्मी दालमिल यांच्याकडे प्रत्येकी एक लाख ७१ हजार रुपयांचा कर थकल्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली. छाया गुप्ता, एन-सहा, साईनगर यांचीही मालमत्ता जप्त केली. वॉर्ड क्रमांक सहा कार्यालयांतर्गत प्रकाशनगरमधील सुनील पालवे यांच्या मालकीच्या इमारतीमधील ज्ञानदीप शाळेला सील करण्यात आले. तीन मालमत्ताधारकांकडून ७३ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला. वॉर्ड क्रमांक आठमध्ये कासलीवाल मार्व्हलमधील दोन मालमत्तांवर जप्तची कारवाई करण्यात आली. विनय आकोट यांची मालमत्ता जप्त केली.

कारवाई टाळण्यासाठी भरले सात लाख रुपये
पंकज फुलपगार यांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत सात लाख ५७ हजार रुपयांचा कर जमा केला. रोशनगेट, किराडपुरा येथील दोन मालमत्ताधारकांकडे थकीत असलेला कर न भरल्यामुळे मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com