लॉकडाउनमध्ये दारूविक्री; १९ दुकानांचे परवाने निलंबित

दत्ता देशमुख
Friday, 19 June 2020

  • जिल्हाधिकाऱ्यांनी ठोठावला प्रत्येकी ५० हजारांचा दंड, 
  • मद्यसाठ्यात आढळली तफावत

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दारू दुकाने बंद करण्यात आली. पण, तरीही या कालावधीत देशी-विदेशी दारूची जिल्ह्यात सर्रास विक्री सुरू होती. हा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या दुकानांतील मद्यसाठा व विक्रीची तपासणी केली. त्या विक्री आणि साठा यामध्ये तफावत आढळल्याने जिल्ह्यातील १९ देशी दारूसह बिअर शॉपी आणि परमिट रूमचे परवाने निलंबित करून प्रत्येक दुकानाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी रेखावार यांनी २१ मार्चपासून दारू दुकाने बंदचे आदेश दिले. दरम्यान, कोरोनाचा कहर रोखण्यासाठी लॉकडाउन सुरूच राहिले. शेवटच्या टप्प्यात ठराविक दुकाने, आस्थापना सुरू करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले. काही जिल्ह्यांत दारू दुकाने सुरू करण्यासही
परवानगी दिली. पण, जनभावना लक्षात घेऊन जिल्ह्यात मात्र देशी-विदेशी दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळण्यास २५ मे उजाडावा लागला. 
दरम्यान, कोरोनाच्या काळात परवानाधारक देशी-विदेशी दारू दुकाने बंद असली तरी बाहेर हातभट्टी आणि देशी-विदेशी दारू अवैध विक्रीचा सपाटा सुरूच होता. दरम्यान, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवायाही जोरात होत्या.

 क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...

या कालावधीत सहाशेंवर आरोपींवर अवैध दारूविक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले होते. मात्र, या अवैध दारू विक्रेत्यांना दारू उपलब्ध कोण करून देतो आणि त्यांच्यावर कारवाई काय होते, हा मुद्दा होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने दुकानांची तपासणी केली. यात तफावत आढळल्याने या १९ दारू दुकानांचे परवाने निलंबित करून प्रत्येकाला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावल्याची कारवाई जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. रजिस्टर अद्ययावत नसने, मद्यसाठ्यात तफावत असणे अशा कारणांनी दोन देशी दारू दुकाने आणि तीन बिअर शॉपी तसेच १४ परमिट रूमवर ही कारवाई करण्यात आली. 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांच्या १६ जूनच्या आदेशान्वये अंबाजोगाई येथील हॉटेल प्रवीण या परमिट रूममध्ये निरीक्षणादरम्यान मद्यविक्री नोंदवह्या सादर न केल्याने तसेच अंबाजोगाई येथील हॉटेल पवन एक्झिक्युटिव्ह येथे मद्यसाठ्यात तफावत आढळून आल्याने दोन्ही परवाना कक्ष अनुज्ञप्ती पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केल्या आहेत. तसेच परळी
येथील पी. व्ही. बिअर शॉपी अनुज्ञप्ती निरीक्षणावेळी बिअर विक्रीचे रजिस्टर सादर न केल्याचे आढळून आलेल्या विसंगतीमुळे सदर बिअर शॉपी परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला. या अनुज्ञप्तीधारकांची मागच्या ता. १६ व १७ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीही घेतली. त्यानंतर या दुकानांच्या परवान्यांचे निलंबन करत प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

मुंबईकरांनो SBI बँकेसंबंधातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी आधी वाचा, कारण २१ तारखेला....
 
‘सकाळ’चा व्यावहारिक मुद्दा तडीस 
एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दारू दुकाने बंद आहेत. पण, अवैध दारूविक्री आणि वाहतूकही सुरू होती. त्यांच्यावर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कारवायाही जोरदार होत होत्या. पण, अवैध दारूविक्री करणाऱ्यांना दारू उपलब्ध करून कोण देतो, उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई का नाही, असा व्यावहारिक व तर्कसंगत मुद्दा ‘सकाळ’ने लावून धरला. एकीकडे शासनाला मिळणारा महसूल बुडवून लोकहितासाठी दारू दुकाने बंद ठेवली जात असताना दुसरीकडे अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया या हेच दुकानदार दारू उपलब्ध करून देत असल्याचा पुरावा असल्याचा मुद्दाही ‘सकाळ’ने लावून धरला. त्यासाठी जिल्ह्यातील परवानाधारक दुकानांच्या साठ्याची तपासणी करावी व त्यांचे निलंबन करावे, असा मुद्दा ‘सकाळ’ने ता. २५ मे रोजीच्या अंकात मांडला. त्यानंतर या कारवायांना वेग आला आणि अखेर १९ देशी-विदेशी दारू दुकानांवर निलंबनाची संक्रांत आणि प्रत्येकी ५० हजारांचा दंड बसला. 
  
या दारू दुकानांवर कारवाई 
तालखेड (अनुज्ञप्ती क्र. ५२) (ता. माजलगाव), प्रवीण बिअर शॉपी (नांदूरघाट, ता. केज), हॉटेल सपना बिअर बार व परमिट रूम परळी, अंजली बिअर बार अँड परमिट रूम होळ (ता. केज), हॉटेल आकाश (तळेगाव घाट, ता. अंबाजोगाई), हॉटेल न्यू पॅराडार्ईज (जोगाईवाडी, ता. अंबाजोगाई), हॉटेल सदिच्छा कान्हापूर (ता. वडवणी), हॉटेल यश पिंपळनेर (ता. बीड),
हॉटेल  रायरी नगर नाका बीड, प्रांजल बिअर शॉपी सिरसाळा (ता. परळी), केज येथील बी. एम. सोनवणे (अनुज्ञप्ती क्र. २०), हॉटेल जनसेवा तुळजाई चौक (बीड), हॉटेल पूनम परळी, हॉटेल लोकसेवा पिंपळवंडी (ता. बीड), हॉटेल विशाल जिरेवाडी (ता. परळी), हॉटेल पवन प्रशांतनगर (अंबाजोगाई), हॉटेल प्रवीण रिंगरोड अंबाजोगाई, पी. व्ही. बिअर शॉपी परळी. 
 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सर्व मद्यविक्री परवानाधारकांकरिता त्यांच्या हिशेबासाठी ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यांनी त्यांचे मद्यविक्रीचे हिशेब अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. त्यात तफावत आढळली तर कारवाई अटळ आहे. मद्यसेवन परवाने हवे असणाऱ्यांनी विभागाच्या संकेतस्थळावरून अर्ज केल्यास तत्काळ परवाना
मिळेल. 
- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बीड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 liquor shop license suspended in Beed dist