हुंडा घेणार नाही : 210 भावी वधू-वरांनी घेतली शपथ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

शिवरायांच्या विचारांचे पाईक व्हा
शिवरायांच्या पावन भूमीत त्यांच्या विचारांचे पाईक म्हणून शपथ घेतो, घेते की, मी हुंडा घेणार अथवा देणार नाही, स्त्रीचा सन्मान करेन या अशा प्रकारची शपथ राजेंद्र पवार यांनी उपस्थितांना दिली.

औरंगाबाद : जिल्हा मराठा सोयरीक ग्रुपतर्फे रविवारी (ता. 23) मराठा वधू-वर परिचय मेळावा पार पडला. यात 210 भावी वधू-वरांसह त्यांच्या पालकांनी हुंडा न देता-घेता लग्न करण्याची शपथ घेतली. मेळाव्यात वधूंनी निर्व्यसनी, सुशिक्षित तसेच हुंडा न घेणाऱ्या वराला प्राधान्य दिले.

सावित्री लॉन्स येथे झालेल्या या मेळाव्यात मुलीचे लग्न अठरा वर्षापूर्वी करू नका, हुंडा देऊ-घेऊ नका, स्त्रीभ्रूणहत्या करू नका असे विचार नानासाहेब जाधव यांनी मांडले. भावी वधू-वरांनीही जोडीदार कसा असावा याविषयी अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी नानासाहेब पळसकर, प्राचार्य सरनाईक, अशोक कुटे, जयकिसन वाघ, दामोदर पवार, श्रीनिवास गवळी, गणेश शेळके, विजय कालभिले, गणेश तांदळे, दिलीप थोटे, संतोष पवार, सरस्वती पालोदकर, के. पी. जंगले, अंकुश मनगटे, राजेंद्र पवार, एस. टी. ढवळे, डॉ. पंडित पळसकर, कौतिकराव पठाडे, ऍड. छाया झिंजुर्डे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सुनील पालोदकर यांनी केले.

सायंकाळीच जुळला विवाह
मेळाव्यादरम्यान साध्या पद्धतीने विवाह करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी रंगनाथ भानुसे (रा. मळ, जि. बुलडाणा, हल्ली मुक्काम औरंगाबाद) यांचा मुलगा संदीप (इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर) आणि प्रभाकर साबळे (औरंगाबाद) यांची कन्या भारती (शिक्षिका) यांचा विवाह जुळला. सायंकाळी विवाह निश्‍चित झाल्याचे सुनील पालोदकर यांनी सांगितले. हा विवाह साध्या पद्धतीने हुंडा न देता होणार आहे.

हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याचा निर्धार
मेळाव्यादरम्यान खुलताबाद तालुक्‍यातील पाडळी येथील वर्षा गायकवाड हिने हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच लग्न करणार आहोत. त्याशिवाय इतर मुलाने विचारूही नये, असे विचार मांडले. तिला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

समाजसेवा म्हणून आयोजित केलेल्या या मेळाव्यातून नोंदणी झालेल्या वधू-वरांच्या माहितीची परिचय पुस्तिका तयार केली जाईल. वधू-वरांच्या पालकांपर्यंत ही पुस्तिका विनाशुल्क पोहोच करणार आहे. यातून जे विवाह जुळतील त्यांना कमी खर्चात लग्न करण्यासाठी समाजातील दाते मंडळींच्या सहकार्याने सामुदायिक विवाह लावण्याचा मानस आहे.
- सुनील पालोदकर, आयोजक, जिल्हा मराठा सोयरीक ग्रुप.

Web Title: 200 couples pledge to do away with dowry