Jalna Crime : वर्षभरात २४ गावठी कट्टे जप्त; सापडली ४४ जिवंत काडतुसे

जालना जिल्ह्यात लूटमारी, वाटमारी, दरोडे अशा गुन्ह्यांत वाढ होत आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर होत आहे.
pistol seized
pistol seizedesakal

जालना - जिल्ह्यात लूटमारी, वाटमारी, दरोडे अशा गुन्ह्यांत वाढ होत आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मागील महिन्यात गावठी पिस्तूल विशेष शोध मोहीम घेतली होती. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे जप्त केले होते.

तथापि, मागील वर्षभरात तब्बल २४ गावठी कट्टे, ४४ जिवंत काडतूस आणि तीन मॉग्झिन जप्त केल्या आहेत. तर ३९ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे स्टील सीटी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याची आता गावठी कट्ट्यांचा जिल्हा म्हणून क्राईम जगतात ओळख होत असल्याचे विदारक चित्र आहे.

उद्योग आणि व्यापारामुळे जालना सारख्या छोट्या जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल होते. या आर्थिक उलाढालीवर गुन्हेगारी क्षेत्रातील अनेकांचा डोळा असतो. परिणामी व्यापाऱ्यांची रोकड लंपास करणे, वाटमारी करणे, भरदिवसा दरोडे टाकणे असे गुन्हे शहरासह जिल्ह्यात घडतात. या गुन्ह्यांत गावठी पिस्तूलांचा वापर वाढल्याने पोलिस प्रशासनाने डिसेंबर २०२३ मध्ये गावठी पिस्तूल शोध मोहीम घेतली होती.

या विशेष मोहिमेच्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १३ गावठी कट्टे आणि ३६ काडतुसे जप्त केली होती. परिणामी वर्षभरात जिल्ह्यातून २४ गावठी कट्टे, ४४ काडतुसे आणि तीन मॅग्झिन जप्त करण्यात आलेल्या आहेत. शिवाय गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांसह काही कट्टे विक्री करणारे संशयित असे एकूण ३९ जणांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

हे गावठी कट्टे इतर राज्यातून जिल्ह्यात येत असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस येऊन पोचले आहेत. मात्र, या गावठी कट्ट्यांच्या साखळीचा मेन म्होरक्या अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे क्राईम जगतामध्ये जालन्याची ओळख ही गावठी कट्ट्यांचा जिल्हा म्हणून होत असल्याचे चित्र आहे.

गावठी कट्ट्यांची विशेष शोध मोहीम राबवून पिस्तूल बागळणाऱ्यांसह विक्री करणारे काही संशयित ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इतरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गावठी कट्ट्यांच्या प्रकरणात पोलिसांचा तपास दोन साखळ्यांपर्यंत पोचला आहे. फरार असलेल्या इतरांना ताब्यात घेतल्यानंतर अजून काही बाबी पुढे येतील. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा गावठी कट्टे शोध मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक, जालना.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गावठी कट्ट्यांची विशेष शोध मोहीम राबवत मागील महिन्यात १३ गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. मागील वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलिस ठाण्यांनी कारवाई करत एकूण २४ गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. शिवाय ४४ काडतुसेही जप्त केली आहेत.

- रामेश्‍वर खानाळ, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.

बऱ्हानपूर येथून गावठी कट्ट्यांचा जिल्ह्यात प्रवेश

जिल्ह्यात आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या गावठी कट्ट्यांची बनावट ही उत्तर प्रदेशातील बऱ्हानपूर येथे तयार होणाऱ्या कट्ट्यांप्रमाणे आहे. या भागात गावठी कट्ट्यांचे कारखाने असून येथून गावठी पिस्तुलांचे रॅकेट चालते अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

दहा ते तीस हजारांपर्यंत होते विक्री

बऱ्हानपूर येथून अत्यल्प दरात गावठी कट्टे जिल्ह्यात दाखल होतात. त्यानंतर मागणी प्रमाणे या गावठी कट्ट्यांचा गुन्हेगारी क्षेत्रात विक्रीचा कारभार चालतो. दहा हजार ते तीस हजारांपर्यंत या गावठी पिस्तुलांची विक्री होत असल्याचे आतापर्यंत झालेल्या पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com