‘सुजलाम सुफलाम’साठी प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

बीड - जिल्ह्यातील नागरिकांचा व गावांचा विकास होण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या योजनेसह इतर विभागांच्या योजना राबवून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

बीड - जिल्ह्यातील नागरिकांचा व गावांचा विकास होण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या योजनेसह इतर विभागांच्या योजना राबवून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

विकासपर्व कार्यक्रमांतर्गत बुधवारी (ता.चार) केज, बीड, व शिरूर तालुक्‍यातील वेगवेगळ्या गावांतील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार संगीता ठोंबरे, संतोष हंगे, रमेश आडसकर यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामविकासाच्या योजना यशस्वीपणे राबविल्यास त्याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील रस्त्यांसह पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावरही भर देण्यात येत आहे. या सर्व योजनांच्या माध्यमातून ग्रामविकासाचा मार्ग सुकर होणार आहे. या सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या विकास योजना पूर्णत्वास नेण्यासाठी कोणती अडचण येणार नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जलयुक्त शिवाराची कामे झाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. यावर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामांमध्ये, तसेच गावशिवारामध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे पीकपरिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. जिल्ह्यातील गावांच्या विकासाचे प्रलंबित असलेले प्रश्‍न येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील. या विकासाच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना योग्य दाबाने आणि नियमित विद्युत पुरवठा करण्यासाठी 

नवीन विद्युत उपकेंद्रे, रोहित्र आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. याशिवाय इंदिरा आवास योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विशेष सहाय्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देऊन त्यांचेही जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य गयाबाई कराड, ॲड. दिलीप करपे, दत्ता पाटील, हिंदूलाल बागडे, शालिनी कराड यांच्यासह अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.                                 

विकास कामांस प्रारंभ
पालकमंत्री मुंडे यांच्या विकासपर्व दौऱ्यात केज मतदारसंघातील गावामध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ, भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले. यामध्ये सावळेश्‍वर, पैठण, युसूफ वडगाव, गोटेगाव, साळेगाव, टाकळी, मस्साजोग, सारूळ पाटी, दहिफळ, तसेच ९ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या केज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाच्या कामाचे भूमिपूजनही त्यांनी या वेळी केले. बीड तालुक्‍यातील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले. यामध्ये तांदळ्याची वाडी, डोईफोडवाडी, येळंबघाट, चाकरवाडी, जेबा पिंप्री ३३ केव्ही सब स्टेशन, सात्रापोत्रा, अंबिलवडगाव, नेकनूर गावांचा समावेश आहे, तर शिरूर तालुक्‍यातील विविध विकासकामांचा प्रारंभ, भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले. यामध्ये श्री क्षेत्र नारायणगड-पोंडूळ, वंजारवाडी  या गावांचा समावेश आहे.

अंगणवाडीतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
केज तालुक्‍यातील पैठण येथील अंगणवाडी केंद्रास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. पालकमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच उपस्थित शिक्षकांना सूचना केल्या. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीचा स्वादही घेतला.