पिस्‍तुलाचा धाक दाखवून अडीच लाख रुपये पळवले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जवळा बाजार : हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार ते परभणी मार्गावर आडगाव रंजेबुवा येथील पुलाजवळ पिस्‍तुलाचा धाक दाखवून दुचाकीस्‍वाराकडील अडीच लाख रुपयांची रक्‍कम पळवल्‍याची घटना घडली असून या प्रकरणी सोमवारी (ता 3) हट्टा पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, परभणी येथील अभयनगर भागातील दिनाराम चौधरी हे जवळा बाजार परिसरात किरकोळ विक्रेत्‍यांकडून साहित्‍य पुरवठ्याची वसुली करतात. रविवारी (ता. 2) चौधरी व त्‍यांच्‍यासोबत अन्य दोघेजण जवळा बाजार येथे वसुलीसाठी आले होते. सायंकाळपर्यंत दुकानावरून वसुली करून सुमारे अडीच लाख रुपयांची रक्‍कम घेवून दुचाकी वाहनाने परभणीकडे निघाले होते. 

जवळा बाजार ते परभणी मार्गावरील आडगाव रंजेबुवा येथील एका पुलावर समोरून चार व्यक्‍ती आल्‍या. त्‍यांनी चौधरी यांचे दुचाकी वाहन अडवले. त्‍यानंतर चौधरी व अन्य दोघांना मारहाण केली. अचानक होत असलेल्‍या मारहाणीमुळे सगळेच घाबरून गेले. त्‍यानंतर त्‍यांनी पिस्‍तुलाचा धाक दाखवून अडीच लाख रुपये घेवून पोबारा केला. त्‍यानंतर चौधरी यांनी रात्री हट्टा पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांच्‍यासह पथकाने घटनास्‍थळ परिसरास भेट देवून पाहणी केली. त्‍यानंतर आज पहाटे या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरु केली असून चौधरी यांच्‍यासोबत असलेल्‍या दोघांचे जवाब नोंदवले जात आहे.

Web Title: 2.5 lakhs rupees stole by pistol