किल्लारी भुकंप : 'मिरॅकल बेबी' करते ज्ञानदान 

killari miracle baby
killari miracle baby

सहाव्या दिवशी जिवंत अवस्थेत सापडली; लष्करी अधिकाऱ्यामुळे मिळाले जीवनदान 

लातूर : भूकंपानंतरचा सहावा दिवस...कुजलेले एकेक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर निघत होते...आक्रोश वाढत होता...अठरा महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह न मिळाल्याने एक बाप टाहो फोडत ढिगाऱ्यावर बसला होता. हे दुःख लष्करी अधिकाऱ्याला पाहावले नाही. त्याने चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुरुंग तयार केला, तो स्वतःच ढिगाऱ्याखाली झेपावला. बऱ्याच प्रयत्नांनंतर आतल्या काळ्याकुट्ट अंधारात त्याल हालचाल जाणवली. त्या दिशेने हात सरकले अन्‌ ती चिमुकली जिवंत असल्याचं जाणवलं. तिला अलगद जवळ घेत त्यानं ढिगाऱ्यातून बाहेर आणलं आणि तिला नाव दिलं, "मिरॅकल बेबी'. आज ही मुलगी भूकंपग्रस्त भागात राहून तिथल्या मुलांना घडवत आहे. प्रियंका जवळगे तिचं नावं. 

किल्लारी आणि परिसरात 30 सप्टेंबर 1993 या दिवशी भूकंपामुळे काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. संसाराची राखरांगोळी झाली. तसाच डोंगर जवळगे कुटुंबावरही कोसळला. घरातली 9 माणसं ढिगाऱ्याखाली सापडली. काही वेळातच त्यांचे मृतदेह मिळाले. पण अजूनही व्यंकट जवळगे यांची गर्भवती पत्नी आणि अठरा महिन्यांची चिमुकली सापडली नव्हती. त्यांचा शोध सुरू होता. भूकंपाच्या दुसऱ्या दिवशी ढिगाऱ्याखाली जिवंत अवस्थेत पत्नी सापडली. तिला रुग्णालयात नेले. पण, बापाचे चित्त मुलगी जिवंत असेल की नाही, याकडे होते. 

पाच दिवस उलटूनही मुलगी सापडली नाही. ढिगाऱ्याखालून माणसांचे आणि प्राण्यांचे कुजलेले मृतदेह बाहेर यायचे. ते पाहून बाप टाहो फोडायचा. त्याची ही अवस्था सेकंड लेफ्टनंट सुमित बक्षी यांना पाहावली नाही. इतरांबरोबरच मुलीचाही मृतदेह बाहेर काढू, म्हणून त्यांनी जवळगेंच्या घराच्या ठिकाणी असलेला मातीचा भलामोठा ढिगारा हलवायला सुरवात केली. आतपर्यंत सुरुंग तयार केला. त्यातून ते स्वतः आत शिरले. पलंगाखाली असलेले बाळ त्यांनी जीव धोक्‍यात घालून बाहेर आणले. "सुमारे दहा फूट ढिगाऱ्याखाली हे बाळ जिवंत होते. जिथे हवा, उजेड, अन्न, पाणी नाही, अशा स्थितीतून सहा दिवसांनी बाळाला बाहेर आणल्यानंतरची जवळगे कुटुंबीयांची आणि माझी अवस्था मी शब्दांत सांगू शकत नाही,'' अशी भावना बक्षी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. "ये सिर्फ उपरवाले का करिश्‍मा हैं. उसने मुझे जरीया बनाया,'' असेही ते म्हणाले. 

सोने, पैसे नाकारले अन्‌ मला जवळ केले 
मी जिवंत आढळल्यानंतर मला दत्तक घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. अमेरिकेतील काही कुटुंबांनी साडेअकरा लाख रुपये देतो, असे सांगितले. श्रीलंकेने माझ्या वजानाइतके सोने देतो, असे सांगितले होते. पण माझ्या वडिलांनी आर्थिक संकटे असतानाही सोने, पैसे नाकारले आणि मला जवळ केले. ही घटना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना समजली. त्या वेळी त्यांनी 'तुम्ही देशाची शान राखली', असे म्हणत वडिलांना बक्षीस दिले होते, असं प्रियंका सांगत होती. सध्या ती किल्लारीजवळील इम्यॅन्युअल पब्लिक स्कूलमध्ये मुलांना शिकवत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com