कचऱ्यावर प्रक्रियेसाठी येणार २७ मशीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेने २७ मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून, २३ एप्रिलपर्यंत निविदा भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच दोन कोटी ३० लाख रुपयांच्या डस्टबिन खरेदी करण्यास प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेने २७ मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून, २३ एप्रिलपर्यंत निविदा भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच दोन कोटी ३० लाख रुपयांच्या डस्टबिन खरेदी करण्यास प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

शहरातील कचराकोंडी ५१ दिवसांनंतरही फुटलेली नाही. त्यामुळे आता कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनची खरेदी केल्यानंतर व प्रक्रिया प्रकल्प सुरू झाल्यानंतरच काही प्रमाणात शहरवासीयांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. राज्य शासनाने मशीन, वाहने खरेदीसाठी ८९ कोटी रुपयांच्या डीपीआरला मंजुरी दिली असून, हा निधी शासन देईल. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील १० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला आहे. त्यानुसार तातडीने नऊ प्रभागांसाठी श्रेडिंग, बेलिंग आणि स्क्रीनिंग अशा तीन प्रकारच्या २७ मशीन खरेदीचा निर्णय घेण्यात आला. 

ही निविदा दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्धीस देण्यात आली आहे. १३ एप्रिलला कंपन्यांसोबत प्री-बिड बैठक घेतली जाईल. २३ ला निविदा उघडतील. २७ मशीनच्या खरेदीसाठी तीन कोटी १६ लाख रुपयांचा अंदाजे खर्च राहणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

दोन कोटींच्या डस्टबिन घेणार 
स्मार्ट सिटीच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यास एसपीव्हीने मंजुरी दिली आहे. त्यात दहा हजार डस्टबिन, यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. डस्टबिनची किंमत चार कोटी ६० लाख रुपयांच्या घरात असून, पहिल्या टप्प्यात दोन कोटी ३० लाख रुपयांच्या पाच हजार डस्टबिन खरेदी केल्या जातील. त्या दहा, १२ आणि २४० लिटर क्षमतेच्या असतील. ज्या भागात कचरा वर्गीकरण होत नाही तेथे या डस्टबिन वाटप केल्या जाणार आहेत. शासनाच्या जेएम पोर्टलवरून १ कोटी ७० लाखांतून चार हुकलोडर, ६५ लाख रुपये किमतीच्या चेसिसची थेट खरेदी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: 27 machine for garbage process