जिल्हा परिषद निवडणुकीत तीन लाख खर्चाची मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

प्रारूप मतदारयादी जाहीर; पंधरा लाख मतदार निवडणार कारभारी
औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना तीन लाख रुपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली असून पंचायत समिती निवडणुकीत हीच मर्यादा दोन लाख रुपये असेल. या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली. जवळपास आठ लाख पुरुष आणि सात लाख महिला मतदार असे एकूण 15 लाख 7 हजार 407 मतदारांतर्फे ग्रामीण भागातील कारभारी निवडले जातील.

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी गुरुवारी (ता.12) पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. "पंचायत इलेक्‍शन' या नावाने असलेल्या वेबसाईटवर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. या अर्जाची प्रिन्ट काढून नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीनिशी सादर करावा लागेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा ग्रामीण भागाशी संबंध असला तरी, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका क्षेत्रालाही आचारसंहिता लागू आहे. मतदारांवर प्रभाव पडेल, अशा घोषणा, कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मदत कक्ष, आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या 62 गटांतील मतदारांची प्रारूप यादी जिल्हा प्रशासनाने गुरुवारी प्रसिद्ध केली. या मतदारयादीबाबत 17 जानेवारीपर्यंत आक्षेप दाखल करता येतील. या आक्षेपांवर सुनावणी घेऊन 21 जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल, असे डॉ. पांडेय यांनी सांगितले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते.

तालुका ----- गटांची संख्या ----- मतदारांची संख्या
औरंगाबाद ----- 10 ----------- 2,16,709
पैठण --------- 9 ------------ 1,99,872
वैजापूर -------- 8 ------------ 1,96,118
गंगापूर -------- 9 ------------ 2,19,383
सोयगाव ------ 3 ------------ 73,342
सिल्लोड ------ 8 ------------ 2,01,458
कन्नड -------- 8 ------------ 2,22,416
फुलंब्री -------- 4 ------------ 1,06,367
खुलताबाद ----- 3 ------------ 71,742
एकूण -------- 62 ----------- 15,07,407

Web Title: 3 lakh expenditure for zp election