हिंगोली जिल्ह्यात ३० शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी १९ जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून, इतर आठ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी १९ जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून, इतर आठ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. 

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. नापिकीमुळे कर्जफेड कशी करावी, या विवंचनेतून शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. जिल्ह्यात दहा महिन्यांत तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात वसमत तालुक्‍यातील वीस, औंढा नागनाथ चार, हिंगोली तीन, सेनगाव दोन, कळमनुरी एक अशा एकूण तीस घटनांचा  समावेश आहे. वसमत तालुक्‍यातील चौदा, हिंगोली दोन, औंढा तालुक्‍यातील दोन तर कळमनुरी तालुक्‍यातील एक अशा १९ शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली आहे. वसमत तालुक्‍यातील तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, इतर आठ प्रकरणांत चौकशीचे काम सुरू असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

नापिकीमुळे आत्महत्या
गेवराई/नांदेड : बीड व नांदेड जिल्ह्यात नापिकी, कर्जामुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

पहिल्या घटनेत माटेगाव (ता. गेवराई) येथे  राजेंद्र किसनराव टेकाळे (वय ४३) यांनी सोमवारी आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील गजानन वसंत शिंदे (वय ३५) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खांबेगाव (ता.लोहा) शिवारात उघडकीस आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 farmer suicide in hingoli district by agriculture loss