धरणांत ३० टक्‍केच पाणी

Water
Water

औरंगाबाद - पावसाळा संपला. परतीच्या पावसाचीही आशा संपत आलीय. तरीही मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा दिवसागणिक आटत चालला आहे. मोठ्या, मध्यम आणि लघुप्रकल्पांसह नद्यांवरील बंधारे मिळून ८६४ प्रकल्पांत केवळ २९.७३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे येत्या काही दिवसांतच पिण्याच्या पाण्याचे वांधे होण्याची शक्‍यता बळावली आहे.

गेल्या काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील संकटे दूर व्हायचे नाव घेईना झालेत. यंदाही सुरवातीपासून मोठी विश्रांती घेत दाखल झालेल्या पावसाने दिलासादायक स्थिती निर्माण केल्याचे चित्र होते; मात्र प्रत्यक्षात फारच भयाण परिस्थिती आहे. पाऊसच नसल्याने धरणांमध्ये पाणीच येऊ शकले नाही.

सद्यःस्थितीत मराठवाड्यातील एकूण ८६४ प्रकल्पांत केवळ २९.७३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या ११ प्रकल्पांपैकी माजलगाव, मांजरा व सीना कोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाणीच नाही. शिवाय येलदरी, निम्न दुधना, सिद्धेश्‍वर या प्रकल्पांची उपयुक्‍त पाण्याची स्थिती समाधानकारक नाही. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत १० टक्‍के, जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ६ टक्‍के, बीडमधील १६ मध्ये १२ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ३१ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत १७ टक्‍के अशी स्थिती आहे. मध्यम प्रकल्पांत एकूण २१ टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. 

७५९ लघुप्रकल्पांची स्थिती फार काही वेगळी नाही. या प्रकल्पांत केवळ २०.४५ टक्के साठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे जालना येथील ५७ प्रकल्पांत ४ टक्‍के, बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पांत पाच टक्‍के साठा शिल्लक आहे. यावरूनच लघुप्रकल्पाजवळील गावांची, तेथील पिण्याच्या पाण्याची अडचण कशी असेल, हे लक्षात येते.

मराठवाड्यातील मोठे प्रकल्प व त्यांची स्थिती
जायकवाडी             ३७
निम्न दुधना           २१
येलदरी                   ९
सिद्धेश्‍वर                २२ 
ऊर्ध्व पैनगंगा          ६६
निम्न मनार           ४० 
निम्न तेरणा           ३५ 
विष्णुपुरी                ८५
माजलगाव           शून्य
सीना कोळेगाव     शून्य
मांजरा                शून्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com