३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

वैजापूर - कर्जबाजारीपणाला व सततच्या नापिकीला कंटाळून गेल्या दोन वर्षांमध्ये तालुक्‍यातील ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. यंदा मात्र तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती येथील तहसील कार्यालयाने दिली. 

वैजापूर - कर्जबाजारीपणाला व सततच्या नापिकीला कंटाळून गेल्या दोन वर्षांमध्ये तालुक्‍यातील ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. यंदा मात्र तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती येथील तहसील कार्यालयाने दिली. 

तालुका अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षापासून पावसाचे अत्यल्प प्रमाण पाहता शेतीव्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या नशिबी सततची नापिकी येऊन अर्थचक्र कोलमडले आहे. उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांसह वित्तीय संस्था अथवा खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची घेतलेल्या कर्जाचे व्याज फेडता फेडता हयात जाते. परंतु कर्जाचा डोंगर तसाच कायम राहतो. 

गेल्या दोन वर्षांमध्ये तालुक्‍यातील एकूण ३२  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नसल्याची ओरड आहे. २०१६ या वर्षात तालुक्‍यातील १९, तर २०१७ या वर्षात १३ अशा एकूण ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा २०१८ मध्ये कर्ज व नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 

शासनाकडून आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत केली जाते. २०१६ मधील १९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी १४ कुटुंबे मदतीसाठी पात्र ठरली. २०१७ मध्ये १३ कुटुंबीयांपैकी केवळ ८ कुटुंबे पात्र ठरली. यामध्ये काही शेतकऱ्यांनी गळफास लावून, विहिरीत उडी घेऊन, तर काहींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्या आहेत. वर्ष २०१६ मध्ये तालुक्‍यातील मनूरमधील तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.  दरम्यान, नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीतून सावरण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी रास्त अपेक्षा आहे.  

अशा योजनांचा लाभ मिळाल्यास संबंधित कुटुंब दुःखाच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत होते. 

प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता 
प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे संबंधित योजना आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांपर्यंत पोचत नाहीत. प्रशासकीय अधिकारी केवळ औपचारिकपणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विविध योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्याची आश्वासने देतात. परंतु काही दिवस उलटून गेल्यानंतर अधिकाऱ्यांनाही त्याचा विसर पडतो.

Web Title: 32 farmer suicide