इसापूर धरणात ३३ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध

संजय कापसे
Wednesday, 10 June 2020

या वर्षीच्या उन्हाळ्यात इसापूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामधून सहा पाणीपाळ्यांच्या माध्यमातून ४६ टक्के पाणी सोडण्यात आल्यानंतरही सद्य:स्थितीत धरणात ३३.१५५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : मागील वर्षी या कालावधीत उणे पाणीसाठा असलेल्या इसापूर धरणात परतीच्या पावसाने अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला. या वर्षीच्या उन्हाळ्यात धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामधून सहा पाणीपाळ्यांच्या माध्यमातून ४६ टक्के पाणी सोडण्यात आल्यानंतरही सद्य:स्थितीत धरणात ३३.१५५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मागील वर्षी इसापूर धरणाच्या जलाशयाने तळ गाठला होता. संपूर्ण पावसाळाभर धरणाच्या लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नाही. मात्र, परतीच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत मिळाली.

हेही वाचा हिंगोली जिल्‍ह्यात पावसाची दमदार हजेरी -

तीन वेळेस पाण्याचा विसर्ग

 धरणाच्या लाभक्षेत्रात बांधण्यात आलेला पेनटाकळी प्रकल्प परतीच्या पावसात भरल्यानंतर या प्रकल्पातून तीन वेळेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचा मोठा लाभ इसापूर धरणाची पाणी पातळी वाढण्यास झाला. परिणामी मृत साठ्यात असलेल्या इसापूरचा पाणीसाठा जिवंत साठ्यात रूपांतरित झाला. 

सिंचन, पाणीपुरवठा योजनांना फायदा 

परतीचा पाऊस व पेनटाकळी धरणामधून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे उणे पाणीसाठा असलेल्या धरणात ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे इसापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या कालव्यावरील सिंचन, पाणीपुरवठा योजनांना लाभ झाला. 

डाव्या कालव्याचा ८४ किलोमीटरपर्यंत लाभ

या वर्षी उन्हाळ्यात इसापूर प्रकल्प प्रशासनाने धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून डिसेंबर, जानेवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात दोन, अशा एकूण पिण्याकरिता व सिंचनासाठी सहा पाणीपाळ्या सोडल्या आहेत. विदर्भात जाणाऱ्या ८४ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यावर असलेल्या ढाणकी, बिटरगाव परिसरापर्यंत पाण्याचा लाभ घेण्यात आला आहे.

४६ टक्के पाणीसाठ्याचा वापर

तसेच १८४ किलोमीटर धर्माबादपर्यंत गेलेल्या उजव्या कालव्यावरील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी याचा उपयोग झाला. त्यामुळे मागील वर्षी उणे पाणीसाठा असलेल्या इसापूर धरणातून सहा पाणीपाळ्यांच्या माध्यमातून जवळपास ४६ टक्के पाणीसाठा वापरण्यात आला.

येथे क्लिक कराहिंगोलीत ३५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत -

उपयुक्त पाणीसाठा ३१९. ६४९० दलघमी

त्यानंतर धरणाची पाणीपातळी आजमितीस ४३२. ८८० मीटर असून एकूण पाणीसाठा ६३४. ६१२७ दलघमी उपलब्ध आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा ३१९. ६४९० दलघमी आहे. मागील वर्षी मायनस ४.६८ ४५ दलघमी पाणीसाठा होता. 

अपेक्षित पाणीसाठा जमा होण्याची अपेक्षा

सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याची टक्केवारी ३३.१५५२ असून एक जूनपासून धरणाच्या लाभक्षेत्रात ५९ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यास धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33% Water Is Available In Isapur Dam Hingoli News