महावितरणच्या मोबाईल ऍपला 34 लाख ग्राहकांची पसंती 

सुषेन जाधव 
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

औरंगाबाद : महावितरणातर्पे वीजग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल ऍपला ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहे. तब्बल 34 लाख ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे असून या ऍपद्वारे वीजबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने ग्राहकांचा वेळ व श्रम वाचत आहे. 

औरंगाबाद : महावितरणातर्पे वीजग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल ऍपला ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहे. तब्बल 34 लाख ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे असून या ऍपद्वारे वीजबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने ग्राहकांचा वेळ व श्रम वाचत आहे. 

वीजग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन, विशेषतः मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. या ऍपद्वारे ग्राहकाला आलेल्या मागील सहा बिलांचा तसेच बिल भरल्याचा तपशीलही पाहता येतो. महावितरणकडे काही कारणास्तव मीटर रीडिंग उपलब्ध झाले नाही तर त्याबाबतची सूचना ग्राहकांना एसएमएसद्वारे कळवण्यात येते. असा एसएमएस प्राप्त झाल्यावर ग्राहक या ऍपद्वारे मीटर रीडिंग व फोटो पाठवू शकतात. या ऍपमधून ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठीही अर्ज करता येतो. 

सव्वा लाख ग्राहकांचे अर्ज 
मागील अडीच वर्षांत या ऍपद्वारे 1 लाख 21 हजार वीजग्राहकांनी नवीन वीजजोडणीचा अर्ज भरला आहे. तर ऍपद्वारे आतापर्यंत 97 हजार 513 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. या ऍपचा वापर करून लाखो वीजग्राहक कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन वीज बिल भरणा करत आहेत. या ऍपशिवाय एसएमएसच्या माध्यमातून नवीन वीजजोडणी, त्याबाबतची सद्यस्थिती, वीजबिलाचा भरणा, वीज मीटर बदलाची माहिती, वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती, वीजबिलाचे स्मरण, वीजबिलावरील पत्ता बदलणे अशा प्रकारच्या सर्वच सेवा सुरू आहेत.

औरंगाबाद परिमंडलात नवीन वीजजोडणीसाठी यापुढे अशा प्रकारे 100 टक्के ऑनलाईन सिस्टिमचा वापर ग्राहकांनी करावा जेणेकरून त्यांना वीजपुरवठा तातडीने देण्यास मदत होईल तसेच ग्राहकांचा महावितरणच्या कार्यालयात जाण्याचा वेळ व श्रम वाचेल आणि महावितरणचे कामकाजही सुरळीत व कार्यक्षम होण्यास मदत होईल, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. 

Web Title: 34 lakhs users like MSEB mobile app