आष्टी (बीड) - भरधाव ट्रकने कारला समोरून जोराची धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. नगर-बीड महामार्गावर पोखरी गावाजवळील पोल फॅक्टरीसमोर रविवारी (ता. 17) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये एक महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे.
सावरगाव (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील रहिवासी असलेले चमकुरे कुटुंब उमरगाव (ता. उमरगाव, जि. बलसाड, गुजरात) येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (ता. 16) मुलगी पाहण्यासाठी या कुटुंबातील नागेश गोविंद चमकुरे (40), योगेश खुशाल चमकुरे (28), अनुजा शंकर चमकुरे (34), अनिकेत शंकर चमकुरे (8), खुशाल महादेव चमकुरे (58), सुशीला खुशाल चमकुरे (52), शंकर खुशाल चमकुरे (37), आरोही शंकर चमकुरे (10) हे सर्व जण इर्टिका कारने मुखेडकडे आले होते.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री ते उमरगावकडे निघाले असताना समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे, अनिकेत चमकुरे हे जागीच ठार झाले. तर, इतर चौघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील लोकांनी जखमी व मृतांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
|