तहसीलदारांसमोर घेतले चार ग्रामस्थांनी विष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मानवत - विविध मागण्यांसाठी मानोली (ता. मानवत) येथील चार ग्रामस्थांनी मानवत तहसील कार्यालयात विष घेतले. हा प्रकार गुरुवारी (ता. 19) सकाळी अकराच्या सुमारास घडला असून, एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे.

मानवत - विविध मागण्यांसाठी मानोली (ता. मानवत) येथील चार ग्रामस्थांनी मानवत तहसील कार्यालयात विष घेतले. हा प्रकार गुरुवारी (ता. 19) सकाळी अकराच्या सुमारास घडला असून, एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे.

मानोली येथील 15 ग्रामस्थांनी दहा एप्रिलला तहसीलदारांना निवेदन देऊन गावातील काही कामांतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, 22 बोगस बंधाऱ्याची चौकशी करावी आदी मागण्या केल्या होत्या. त्यावर विचार न झाल्यास 19 एप्रिलला सामुदायिक आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यानुसार ग्रामस्थ आज सकाळी तहसीलमध्ये दाखल झाले. पोलिसांनी तपासणी करून त्यांना तहसीलदारांच्या दालनात प्रवेश दिला. प्रभारी तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्याशी चर्चा करीत असताना लक्ष्मण शिंदे यांनी सोबत आणलेले विष घेतले. त्यानंतर इतर ग्रामस्थांनीही विषाची बाटली तोंडाला लावण्याच्या प्रयत्न केला. त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न पोलिस करीत असताना झालेल्या झटापटीत चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम, शेख शगीर यांनीही कीटकनाशक घेतले. त्यातील काही अंश अंगावर पडल्याने सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर भोवळ येऊन कोसळले. शहरातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सर्वांना परभणीतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. यापैकी शेख शगीर यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 4 people poison in front of Tahsildar