संकटकाळातही ४१ दात्‍यांनी जपले सामाजिक भान

विनायक हेंद्रे
Saturday, 4 April 2020

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील बोंढारे व मित्रमंडळातर्फे ‘संकटकाळी माझं योगदान, चला करू रक्तदान’ हा उपक्रम हाती घेत शुक्रवारी कुसुमताई सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. 

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना रक्तदान चळवळीवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणची शिबिरे बंद असल्याने रक्त पिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील बोंढारे व मित्रमंडळातर्फे ‘संकटकाळी माझं योगदान, चला करू रक्तदान’ हा उपक्रम हाती घेत शुक्रवारी (ता. तीन) कुसुमताई सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्‍तदान शिबिरात ४१ दात्‍यांनी रक्‍तदान करत संकटकाळतही सामाजिक भान जपले आहे.

कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. शासन व प्रशासनही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर स्वच्छता यंत्रणा जबाबदारीने काम पार पाडत आहे.  नागरिकही स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेत आहेत. तरीही कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे.

हेही वाचा‘मी हिंगोलीकर... स्वयंशिस्त पाळणार, घरातच थांबणार!’

सभापती दत्ता पाटील बोंढारे यांचा पुढाकार

 दरम्यान, रुग्णाचे प्रमाण वाढत असताना रक्तदाते घरात अडकून पडल्याने रक्तदान शिबिरावर परिणाम झाला आहे. परिणामी अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे. संकटकाळात रक्ताच्या पिशव्या आणणे रुग्णांच्या कुटुंबीयांसमोर आव्हान बनले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ लक्षात घेता आपणही संकटकाळात कुणाच्या तरी कामी आले पाहिजे, ही सामाजिक जाण लक्षात घेता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील बोंढारे व मित्रमंडळाने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 

सामाजिक भान जपत रक्तदानासाठी योगदान

सामाजिक योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून ‘संकटकाळी माझं योगदान, चला करू रक्तदान’ हा उपक्रम हाती घेत दात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही वेळातच तब्बत ४१ दाते रक्तदानासाठी तयार झाले. येथील कुसुमताई सभागृहात शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये या ४१ दात्यांनी रक्तदान करून संकटकाळतही सामाजिक भान जपत रक्तदानासाठी योगदान दिले. 

येथे क्लिक करा हिंगोलीकरांना दिलासा; चौघांचे अहवाल निगेटिव्ह

मित्रमंडळाचे योगदान

कार्यक्रमास जिल्‍हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष संजय बोंढारे यांची उपस्‍थिती होती. कार्यक्रमासाठी प्रवीण बायस, शहाबाज कुरेशी, चेअरमन पांडुरंग बोंढारे, मोहम्मद गौस, संदीप नरवाडे, संदीप बोंढारे, नागेश बोंढारे, प्रमोद बयास, किशोर बोंढारे, चंद्रकिशोर घोडगे, राज बोंढारे, प्रदीप हरण, ऋषिकेश बोंढारे, सचिन पाटील हेंद्रे, अविनाश पानपट्टे, महेश धांडे, ज्ञानेश्वर पडघणे, विष्णू हरण यांनी पुढाकार घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 donors maintain social awareness even in times of crisis Hingoli news