दोन दशकांपासून रखडलेल्या भूसंपादनासाठी ६८ कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बाह्यवळण रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार

परभणी ः शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाने ६८ कोटी निधीच्या तरतुदीस मंजुरी दिल्यामुळे रखडलेला बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शहरातून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न गेल्या दोन दशकांपासून निधी व भूसंपदनाअभावी रखडलेला आहे. परंतु, गुरुवारी (ता. १३) केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाचे अव्वर सचिव रणजित रॉय यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाहाच्या सचिवांना पत्राद्वारे ही तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे.

रस्ते बांधकामासाठी साडेतीनशे कोटी अपेक्षित
नव्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरून पारवा शिवारातून उत्तरेकडून असोला पर्यंतच्या १४.७५ किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी ३५० कोटींचा खर्च अपेक्षित असून या कामाचा प्रस्तावदेखील अंतिम मान्यतेसाठी वार्षिक आराखड्यात घेण्यात आलेला आहे.

हेही वाचा - नळजोडणी दर कमी करण्यासाठी सरसावले सर्वच पक्ष

भूसंपादनासाठी ६८ कोटींचा निधी
या रस्त्यासाठी ८४ हेक्टर ४५ आर. जमीन संपादित करावी लागणार आहे. त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी केंद्रशासनाने ६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये पारवा शिवारात १.७६ हेक्टर, धर्मापुरी शिवारात १०.७४ हेक्टर, परभणी शिवारातील ४२.१५ हेक्टर, वांगी शिवारातील १५.८९ हेक्टर व असोला शिवारातील १३.९१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी ६० कोटी ४५ लाख ७३ हजार ९०३ रुपये लागणार आहेत. आस्थापनेवर ९० लाख ६८ हजार ६०९ रुपये, कार्यालय पुरवठा व आस्थापनेसाठी ६० लाख ४५ हजार ७३९ रुपये, न्यायालयीन दाव्यांसाठी सहा कोटी चार लाख ५७ हजार ३९० रुपये, अशी एकूण ६८ कोटी एक लाख ४५ हजार रुपयांची तरतूद आहे.

हेही वाचा - ‘व्हॅलेटाईन डे स्पेशल’ : ‘अशू-मशू’ची यशस्वी प्रेम कहाणी...

शहरातील रस्ता मृत्यूचा सापळा
शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. विसावा कॉर्नर ते खानापूर फाटा या मार्गावर शेकडो अपघात झालेले असून त्यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर अनेक जण कायमचे दिव्यांग झाले. या रस्त्यावर मोठी वाहतूक असून रस्त्यावर अनेक वसाहती, शाळा, महाविद्यालये, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. त्यामुळे मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला अतिक्रमणांचीदेखील रेलचेल आहे. त्यामुळे सातत्याने येथे छोटे-मोठे अपघात होत असतात.

सहा-सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू
बाह्यवळण रस्त्यासाठी मागील सहा-सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून त्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बाह्यवळण रस्त्यामुळे शहराच्या उत्तरेस १४ किलोमीटर लांबीचा भाग विकासाच्या मार्गावर येणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाणदेखील कमी होणार आहे. - प्रवीण देशमुख, कार्यकारी परिषद सदस्य, कोकण कृषी विद्यापीठ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 68 crores sanctioned for land acquisition for two decades