‘व्हॅलेटाईन डे स्पेशल’ : ‘अशू-मशू’ची यशस्वी प्रेम कहाणी...

गणेश पांडे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

परभणीतील महेश कुलकर्णी नामक तरुणांने हिंमत दाखवत स्वकर्तृत्व सिद्ध करून लहानपणीचे प्रेम मिळविले. आज पत्नी असावरी व महेश यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होऊन सुखाचा संसार सुरू आहे.

परभणी : असं म्हणतात, की प्रेमात त्यांनीच पडाव, ज्यांच्यामध्ये प्रेमाचा शेवट गोड करण्याची हिंमत असते..! कारण खऱ्या प्रेमाचा शेवट तर गोड होतच नाही. यात दोघांपैकी एकाचे तरी आयुष्य पणाला लागलेले असते. परंतु, परभणीतील महेश कुलकर्णी नामक तरुणांने हिंमत दाखवत स्वकर्तृत्व सिद्ध करून लहानपणीचे प्रेम मिळविले. आज पत्नी असावरी व महेश यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होऊन सुखाचा संसार सुरू आहे.

जे प्रेम आकर्षणाने मिळते ते क्षणिक असते, कारण ते अज्ञानामुळे वा मोहामुळे निर्माण झालेले असते. यामध्ये आकर्षण कमी होण्यासोबत मोह भंग होतो. आणि तुम्हाला उबग येते. हळूहळू हे प्रेम कमी होत जाऊन त्याजागी भीती, अनिश्चितता, असुरक्षितता आणि औदासिन्य येते. जे प्रेम सुख सुविधामुळे तयार होते. त्यात घनिष्टता असते. परंतु, त्यात जोश, उत्साह आणि आनंद नसतो. या दोन्ही प्रेमांपेक्षा दिव्य प्रेम उत्कृष्ट आहे. ते सदाबहार आणि नित-नवीन राहते. याच्या जितके जवळ जाल तितके ते आकर्षक आणि गहन होत जाते. याचा कधीही कंटाळा येणार नाही, उलटे ते प्रत्येकाला उत्साही ठेवते.
प्रापंचिक प्रेम सागराप्रमाणे असते; पण सागरालादेखील तळ आहेच नां. दिव्य प्रेम आकाशाप्रमाणे असीम असते. ज्याला कोणतीही सीमा नसते. सागराच्या तळाऐवजी असीम आकाशात भरारी मारा. दिव्य प्रेम कोणत्याही नाते-संबंधापेक्षा श्रेष्ठ आणि सर्व नाते-संबंधाना सामावून घेणारे असते.

हेही वाचा - ‘प्रेमी युगुलां’च्या प्रेमाला आज येणार बहर

अनामिक ओढीने आकर्षण वाढले
परभणीतील त्रिमूर्तीनगरमधील रहिवाशी महेश कुलकर्णी या तरुणाच्या बाबतीतही असेच घडले. त्यांचे लहानपणापासून त्याच्या बीड येथील मामाच्या मुलीवर (आसावरी जोशी) प्रेम जडले. महेशचे प्रेम एकतर्फी नव्हते... ‘आग दोनो तरफ से बराबर लगी हुयी थी...’ त्यामुळे दोघांचे एकमेकांबद्दल आकर्षण वाढत होते. लहानपणी लग्न कार्य, उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये या दोघांची भेट होत असे. त्यातूनच दोघांचे प्रेम बहरत होते. दोघांनाही एक अनामिक ओढ एकमेंकाकडे आकर्षित करीत होती. त्यामुळे भेटीची कोणतीही संधी हे दोघे सोडत नसत.

लहानपणीच बांधल्या मुंडावळ्या
असावरी व महेश हे दोघे आत्या - मामाची मुलं. त्यामुळे सहाजीकच घरात शुभ कार्य ठरले की या दोघांची भेट व्हायची. २००१ सालीदेखील महेशच्या मोठ्या मामाच्या मुलीचे लग्न ठरले. आणि मग काय महेशही बीडमध्ये हजर. त्यावेळी घरातील लहान मुलांनी खेळा - खेळामध्ये या दोघांना मुंडावळ्या बांधल्या व अशू - मशू हे नवरा - बायको असे म्हणून जाहीर केले. घरातील मोठ्या सदस्यांनाही दिल्लगीमध्ये ही जोडी जाहीर करून ठाकली. तेव्हापासून या दोघांना नवरा-बायको म्हणून चिडविले जायचे.

हेही वाचा - सांगा, आम्ही जगायचे तरी कसे : असं कोण म्हणालं आणि कशामुळे

अशी घातली लग्नाची मागणी
असावरी व महेश यांना एकमेकांबद्दल कायम आकर्षण होते. एकमेंकाचे दोघावर प्रेम ही होते. परंतु, अडसर होता तो महेशच्या नोकरीचा.. पंरतु, आसावरीशी लग्न करण्याची ओढ महेशला स्वस्त बसू देत नव्हती. त्याने नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांचा मार्ग स्वीकारला. त्यात त्याला २०१४ साली यश आले आणि महेश मंत्रालयात चांगल्या नोकरीला लागला. परीक्षा उत्तीर्ण झाली की लगेच महेशने आई - वडिलांकडे आसावरीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आई - वडिलांनीदेखील विरोध न करता आसावरीला लग्णासाठी मागणी टाकली.

प्रेमाचा शेवट कधीच वाईट नसतो
माझ्या व आसावरीच्या लग्णाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आमचा संसार मुंबईत सुखाने सुरू आहे. प्रेमाचा शेवट कधीच वाईट नसतो. फक्त आपल्या साथीदारांला मिळविण्याची हिंमत आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाची क्षमता मात्र, अंगी असली की यश हमखासच मिळते.
- महेश कुलकर्णी, परभणी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine's Day Special: Success love Story of Asu-Mashu ...