औरंगाबादचे ७ तरुण अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

तीन तास मृत्यूशी झुंज
दुपारी पाऊणच्या सुमारास अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अमोल चवरे आणि रवींद्र वाडेकर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे, मृतांची ओळख लवकर पटू शकली नाही. शेवटी तीन तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सर्व मृत औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.

नंदू किशनराव पवार (वय २८), सुरेश कान्हेरे (२७), अमोल निळे (२५), अमोल रमेश चवरे (२५), रवींद्र वाडेकर (२७, पाचही जण रा. शेरणापूर, ता. औरंगाबाद), गोपी कडुबा वरकड (३१) व महेश नंदी पाडळे (२७, दोघेही रा. दौलताबाद) अशी मृतांची नावे आहेत.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - औरंगाबाद जिल्ह्यातील सात मित्र शनिवारी (ता. एक) मोटारीने (एमएच- २०, डीव्ही- ७०९८) पर्यटनासाठी निघाले होते. कोल्हापूरमधील पर्यटनस्थळांना भेट देऊन ते बेळगावमार्गे गोव्याला निघाले होते. दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजनजवळ भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटला. मोटार दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनमध्ये येऊन उलटली.

त्या वेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकची (एमपी- ०९-७७३४) मोटारीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की मोटारीचा चक्‍काचूर झाला. मोटारीतील पाचजण जागीच ठार झाले. दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना बेळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पोलिस आयुक्‍त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्‍त सीमा लाटकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतांच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली. नातेवाईक सायंकाळी बेळगावात आल्यानंतर मृतांची ओळख पटली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 Youth Death in accident