धक्कादायक...! तुम्ही खवा विकत घेतलाय तर ही बातमी वाचा... 

गणेश पांडे
शनिवार, 23 मे 2020

 सहा महिन्यांपासून परभणीसह बीड व  हिंगोली जिल्ह्यातील बाजारात बनावट खवा विक्री होत होता. मनुष्यास विषबाधा होईल, अश्या पध्दतीने या खव्याची वाहतुक केली जात होती. त्यामुळे अनेकांना याची बाधा झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट खवा विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे.

परभणी : एका नामांकिंत कंपनीचे नाव वापरून बनावट खवा विकणाऱ्या परभणीतील गिरीष शंकरलाल माटरा या खवा विक्रेत्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह शनिवारी (ता.२३) अडीच वाजता ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८४० किलो बनावट खवा व एक वाहन जप्त करण्यात आले आहे.
 परभणी शहरातील नानलपेठ भागात राहणारा गिरीष शंकरलाल माटरा हा साई प्रोडक्टस वलाड (गांधीनगर, गुजरात) या कंपनीच्या नावाने जामखेड (जि. अहमदनगर) येथे बनावट खव्वा अथवा दुग्धजन्य पदार्थ जामखेड येथील साथीदारांच्या मदतीने जामखेड येथे तयार करून विक्रीसाठी परभणी येथे येवून परभणी, बीड व  हिंगोली जिल्ह्यात विक्री करतो, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा परभणीला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी (ता.२३) पहाटे दोन अडीच्या सुमारास नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत (एमएच १६ सीसी ५८२१) या क्रमांकाच्या पिकअप वाहनासह पाच जणांना ताब्यात घेतले. यात गिरीष शंकरलाल माटरा (रा.परभणी), सय्यद असलम हसन (रा.जामखेड), सलमान चॉंद शेख (रा.जामखेड), करण महेंद्र शिंदे (वाहन  चालक रा. जामखेड) व सय्यद अहेमद हसन (रा.जामखेड) यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : का? फेकले तिने बाळाला शेतात, कारण वाचून हैराण व्हाल...

जामखेडला बनायचा बनावट खवा
पोलिसांच्या तपासात आरोपींनी जामखेड येथे सय्यद असलम हसन याच्या घरी बेकायदेशिररित्या खव्वा तयार करून साई प्रोडक्टस, वलाड, गांधीनगर (गुजरात) या कंपनीच्या नावाची पाकीटे गुजरातमधून मागवून घेवून हा खव्वा आयएसओ प्रमाणित असल्याचे दाखवून मागील सहा महिण्यापासून मिठाई तयार करणाऱ्या उत्पादकांना त्याची विक्री करून, आपसात कट रचून त्यांच्याकडे खव्वा अथवा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना, शैक्षणिक व तांत्रिक गुणवत्ता, कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसतांनाही स्थानिक व्यापाऱ्यांची फसवणुक केलेली आहे असे उघड झाले.

हेही वाचा व पहा  : व्वा!  नवरा इकडे, नवरी तिकडे तरीही झाले लग्न, पाहा VIDEO
 

विना वातानुकलीत गाडीत आणला जात होता खवा
खव्वा किंवा इतर दुग्ध जन्य पदार्थ हा वातानुकुलीत वाहनातून वाहतुक  करावयास पाहिजे असतांनाही प्रखर उन्हाळ्यात जामखेड येथून परभणी येथे उन्हाच्या सरळ संपर्कात त्याची वाहतुक करून मनुष्यास विषबाधा होईल अश्या रितीने वाहतुक केली. मागील सहा महिण्यापासून बेकायदेशिर अपायकारक उत्पादनाची विक्री केली असल्याचे उघड झाले आहे.

एक लाख ३४ हजाराचा खव्वा जप्त
या कारवाईत पिकअप वाहन (दोन लाख ५० हजार) तसेच बेकायदेशीर उत्पादन केलेले २८ गोण्यातील एकूण ८४ सिलबंद खव्याची पाकीटे असा एक लाख ३४ हजार रुपयांचा ८४० किलो खवा हा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, फौजदार किशोर नाईक, हनमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, भगवान भुसारे, हरिशचंद्र खुपसे, अरूण पांचाळ, राजेश आगाशे यांनी केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 840 fake food seized , Parbhani News