शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात 92 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

लातूर - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी (ता. तीन) जिल्ह्यातील 51 केंद्रांवर शांततेत मतदान झाले. ओळखीचे पुरावे देऊनच मतदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आवाहनाला शिक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातूनच जिल्हाभरात 92.35 टक्के मतदान झाले. दहा हजार 189 पैकी नऊ हजार 410 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लातूर - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी (ता. तीन) जिल्ह्यातील 51 केंद्रांवर शांततेत मतदान झाले. ओळखीचे पुरावे देऊनच मतदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आवाहनाला शिक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातूनच जिल्हाभरात 92.35 टक्के मतदान झाले. दहा हजार 189 पैकी नऊ हजार 410 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार आमदार विक्रम काळे, भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार प्रा. भालचंद्र येडवे व शिक्षक संघटनेचे उमेदवार कालिदास माने यांनी येथील मतदान केंद्रावर हक्क बजावला.
या निवडणुकीत आयोगाने पहिल्यांदाच पारदर्शकेतसाठी मतपत्रिकेवर उमेदवाराचा, तर मतदार यादीवर मतदारांचा फोटो छापला होता. त्यापुढे जाऊन विविध प्रकारचे तेरा पुरावेही ओळखीसाठी देण्याचे आवाहन शिक्षकांना केले होते. पुराव्याशिवाय मतदान करता येणार नसल्याचे आधीच स्पष्ट केल्यामुळे बनावट मतदानाला चांगलाच आळा बसला. आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओळखीचे पुरावे देऊन मतदान करण्यासाठी शिक्षकांनी केंद्रावर गर्दी केली होती. मतदानाला सुरवात झाल्यापासूनच मतदारांत उत्साह होता. तो मतदानाची वेळ संपेपर्यंत टिकून होता. मतदान करण्याचे राहून गेलेल्या शिक्षकांना मोबाईल करून तातडीने मतदान करण्यासाठी उमेदवारांचे समर्थक व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आग्रह धरत होते. प्रमुख उमेदवार जिल्ह्यातील असल्याने मतदारांकडून मतदान करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. मतदान करण्यासाठी शिक्षकांकडे सकाळपासूनच पाठपुरावा सुरू होता. यासाठी शिक्षकांच्या गटानुसार उमेदवारांनी समर्थकांची नियुक्ती केली होती. या समर्थकांनी त्यांच्या गटातील शिक्षकांकडे मतदान करेपर्यंत पाठपुरावा करताना दिसले. मतदान केंद्राबाहेर मतदारयादीतील नाव शोधून देण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी मंडपाची उभारणी केली होती. यातूनच जिल्ह्यात चांगले मतदान झाले.

काही ठिकाणी शंभर टक्के
जिल्ह्यात आठ हजार 353 पैकी सात हजार 822 पुरुष, तर एक हजार 836 पैकी एक हजार 588 महिला मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर 85 टक्‍क्‍यांच्या पुढे मतदान झाले. जिल्ह्यातील चिंचोली (बल्लाळनाथ, ता. लातूर), कारेपूर व पोहरेगाव (ता. रेणापूर), नागलगाव (ता. उदगीर) व मदनसुरी (ता. निलंगा) येथील केंद्रावर शंभर टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी दिली.

Web Title: 92 per cent of the voting constituency in the district teachers