दीड हजारावर बेरोजगारांना ‘ऑन दी स्पॉट’ नियुक्तिपत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

आष्टीसारख्या दुष्काळी भागातील तरुणांमध्ये गुणवत्ता आहे; परंतु शहरात जाऊन नोकरी मिळविणे सर्वांनाच शक्‍य होत नाही. त्याचा विचार करून हा मेळावा घेण्यात आला. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळून रोजगाराची संधी उपलब्ध झाली. यापुढेही तरुणांच्या प्रगतीसाठी असे उपक्रम राबविणार आहे.
- सतीश शिंदे, आयोजक

आष्टी - आष्टी शहरात आयोजित नोकरी महोत्सवाला रविवारी (ता. २१) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे सात हजार जणांनी मेळाव्यात मुलाखती दिल्या. त्यातील एक हजार ५४० सुशिक्षित बेरोजगारांना ‘ऑन दी स्पॉट’ नियुक्तिपत्रे देण्यात आली. त्यामुळे तरुणांच्या रोजगाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आष्टी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सव भरविण्यात आला. लक्ष्मी लॉनमध्ये सकाळी नऊला माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‌घाटन झाले. ॲड. वाल्मीक निकाळजे, श्रीधरपंत सहस्रबुद्धे, सुधीर घुमरे, अशोक साळवे उपस्थित होते. यानंतर बेरोजगारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू झाली. मेळाव्यासाठी शनिवारी (ता. २०) रात्रीपर्यंत आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्‍यातील एकूण साडेपाच हजार तरुणांनी नोंदणी केली. आज सकाळी मेळाव्यास तरुणांची गर्दी उसळली. ऐनवेळी सुमारे दीड हजार बेरोजगारांनी नोंदणी केली. 

राज्यभरातून आलेल्या सुमारे ३६ नामांकित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तरुणांच्या मुलाखती घेतल्या. एकूण सुमारे सात हजार जणांनी मुलाखती दिल्या. पाचवी ते बारावी उत्तीर्ण, बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., अभियांत्रिकी, आयटीआय, वैद्यकीय अभ्यासक्रम, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील एक हजार ५४० बेरोजगारांना लगेचच नियुक्तिपत्र देण्यात आले. जागेवरच नियुक्तिपत्र मिळाल्याने अनेक तरुणांनी समाधान व्यक्त केले. दुपारी चार वाजेपर्यंत मुलाखतीची प्रक्रिया पार पडली.

Web Title: aashti mararthwada news 1500 unemployee on the spot selection letter