अभिनव गोयल आता लातूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

हरी तुगावकर
Tuesday, 14 July 2020

लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची ता. १७ फेब्रुवारीला नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती.

लातूर - लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अभिनव गोयल यांची शासनाने मंगळवारी (ता. १४) नियुक्ती केली आहे. श्री. गोयल सध्या किनवट (जि. नांदेड) येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची ता. १७ फेब्रुवारीला नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या पदाचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्याकडे होता.

पालकमंत्री अमित देशमुख या पदावर कोणाला आणतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यात शासनाने मंगळवारी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात श्री. गोयल यांची किनवट येथून येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. गोयल यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. 

ही वाचा- सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारी ४९ हजार अन् गुन्हे केवळ ४६! खंडपीठात झाली सुनावणी 

अवघ्या वीस ते एकवीस महिन्यांच्या कार्यकाळात श्री. गोयल यांनी आदिवासी आश्रमशाळांचा कायपालट करण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. गोयल यांची ता. आठ ऑक्टोबर २०१८ रोजी किनवट येथे नियुक्ती झाली होती. या दोन पदभाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे माहूर गडावरील रेणुकादेवी संस्थानचे सचिव पद होते. अल्पावधीतच त्यांनी किनवट, माहूर तालुक्यात आपल्या कार्यपद्धतीची छाप सोडली. त्यांच्या काळात आदिवासी आश्रमशाळेत विविध सोयीसुविधांसह अनेक उपक्रम राबवले.

हेही वाचा- उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाची अवमान नोटीस, पण कशामुळे?  

त्यात सिकलेस तपासणी अभियान, सिक रूम, भोजनशेड, व्यायामशाळा, स्वच्छतागृह, संगणक कक्ष, डीप फ्रीजर, स्पीकर, प्रोजेक्टर, हँडवॉश स्टेशन, ग्रंथालय, क्रीडा साहित्य, रोटी मेकर मशीन, जलशुद्धीकरण यंत्र, इन्सिनेटर मशीन, सीसीटीव्ही अशा सोयीसुविधा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना पोचवून आश्रमशाळेचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. 

(संपादन - विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhinav Goel has been posted as Latur Zilla Parishad CEO