
माजलगाव (जि.बीड) शहरातील जुना मोंढा भागात असणाऱ्या भैरवनाथ ट्रेडिंग या आडत दुकानात कापुस खरेदी करून साठा करण्यात आला होता.
माजलगाव (जि.बीड) : शहरातील जुना मोंढा भागात असणाऱ्या भैरवनाथ ट्रेडिंग या आडत दुकानात कापुस खरेदी करून साठा करण्यात आला होता. या साठ्याला शनिवारी (ता.१९) संध्याकाळी ६ वाजता अचानक आग लागली. दरम्यान नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी हानी टळली आहे. जुना मोंढा भागातील तुळजाभवानी अर्बनच्या बाजूस विशाल गणेश शिंदे यांचे भैरवनाथ ट्रेडिंग आडत दुकान आहे. या दुकानात खासगी कापूस खरेदी केली जाते. शनिवार संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी असलेल्या कापसाच्या साठ्यातून धूर निघत असल्याचे दिसून आले.
लागलीच आजूबाजूच्या नागरिकांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला याची कल्पना दिली. त्यावेळी तत्परते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कापसाने आगीचे रौद्ररूप धारण करण्यापूर्वी आग आटोक्यात आणली. यावेळी दुकानात जवळपास १०० क्विंटलच्या जवळपास कापसाचा साठा होता. यातील २० क्विंटल कापसाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
या दुकानाच्या आजूबाजूस धान्याच्या दुकाना होत्या. परंतु सुदैवाने अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आल्याने मोठी आर्थिकहानी टळली आहे. यावेळी अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक अनिल भिसे, चालक दत्ता सावंत, रोहित भिसे, जावेद शेख, सय्यद साहिल होते.
Edited - Ganesh Pitekar