ट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक

शिरीष जोशी
Saturday, 28 March 2020

आठ ट्रकमधून ३९६ मजुरांची वाहतूक होत असल्याचे कनेरगाव नाका येथील तपासणी नाक्यावर समोर आले आहे. हे आठही ट्रक आंध्रप्रदेश, तेलंगाणा राज्यातून राजस्थानकडे जात होते. यातील मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून हिंगोलीतील एका इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे.

 कनेरगाव नाका( जि. हिंगोली) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य, केंद्र शासनाने जिल्हा, राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र, तरीही विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. कनेरगाव नाका (ता. हिंगोली) येथील तपासणी पथकाने तब्बल आठ ट्रकमधून ३९६ मजुरांची होणारी वाहतूक शुक्रवारी (ता.२७)  रोखली आहे. यातील हे आठही ट्रक आंध्रप्रदेश, तेलंगाणा राज्यातून राजस्थानकडे निघाले होते. यातील ३९६ मजूर बंद ट्रकमध्ये बसलेले होते. सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

हिंगोली ते वाशीम मार्गावर कनेरगाव नाका येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका उभारण्यात आला आहे.  जिल्ह्यातील सीमांवर कडक पहारा ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी दिल्या आहेत. गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी.  शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी येथील तपासणी नाक्याला भेट देऊन पाहणी केली होती. सीमाबंदी केल्यानंतर धान्य, वस्तुंची वाहतूक करणाऱ्या ट्रकची कसून तपासणी केली जात आहे.

हेही वाचा - वाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन

व्ही. डी. श्रीमनवार यांच्या पथकाने पकडले ट्रक

शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका पाठोपाठ एक असे आठ ट्रक हिंगोलीकडून वाशीमकडे निघाले होते. सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांच्या पथकाने आठ ट्रकला थांबविले. यामध्ये (आरजे ३०-जी. बी. ०५९५), (आरजे ५०-जीए-८८८३), (आरजे १०-जीए-७६१६), (आरजे ५०-जीए-०७८३), (जीजे ३६-टी ८६६०), (आरजे २०-जीसी १६११), (आरजे ३०-जीबी३४९५), (आरजे२७-जीसी५४९५) या ट्रकचा समावेश आहे.

ट्रकची केली तपासणी

 ट्रक थांबविल्यानंतर चालकाकडे ट्रकबाबत विचारणा करण्यात आली. सदर ट्रक तेलंगणा व आंध्रप्रदेशातून राजस्थानकडे जात असल्याचे चालकांनी सांगितले. मात्र ट्रक मधील साहित्याबाबत चालकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये लाकडी पाट्या टाकून त्यावर कामगार बसलेले आढळून आले. या सर्व ट्रकची तपासणी केली असता त्यात एकूण ३९६ कामगार आढळून आले. सर्वांना ट्रकमधून खाली उतरवून त्यांची वैद्यकीय तपासणी  करण्यात आली.

३९६ कामगारांची वैद्यकीय तपासणी

यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जाधव, डॉ. शरद गावंडे, डॉ. कल्याणी जाधव, डॉ. प्रियंका देशपांडे, डॉ. अक्षय बंगाळे, आरोग्य कर्मचारी फुलेवार, पी. एन. इंगळे, व्ही. टी. मगर यांनी तपासणी केली. ३९६ कामगारांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना हिंगोली येथील एका इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्‍यान, काही मजूर पकडल्याची माहिती मिळताच हिंगोली येथील सीजी ग्रुपचे गोपाल जांगीड यांच्यासह रामेश्चर खोरणे, पांडुरंग वैद्य, आकाश देवकर, अशोक नेव्हल, संतोष भोस गोविंद जांगीड यांनी मजुरांच्या भोजनाची व्यवस्‍था केली.

येथे क्लिक कराहिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर

गिरगावातही ट्रकची तपासणी

गिरगाव : विजयवाडा येथून कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकची गिरगाव (ता. वसमत) येथे शनिवारी (ता.२८) सकाळी अकरा वाजता तपासणी करण्यात आली. (जीजे ०६ एझेड ५७८०) हा आयशर गुजरातकडे छुप्या मार्गाने जात होता. हा आयशर नांदेड रोडवर असलेल्या शाळेच्या पाठीमागे थांबला होता. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे कामासाठी गेलो होतो. मात्र तेथील काम बंद झाल्याने परत गुजरातकडे जात असल्याचे कामगारांनी सांगितले. 

पोलिसांनी केली तपासणी

या वेळी सरपंच मारोती कुंभारकर, पोलिस पाटील गंगाधर शिवणकर, ग्रामसेवक रमेश खंदारे, भाई पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. कऱ्हाळे, प्रमोद नादरे, शिवाजी कऱ्हाळे, विश्वनाथ कऱ्हाळे आदी उपस्थित होते. त्‍यांनतर ही माहिती कुरुंदा पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर यांनी भेट देवून ट्रक चालकाची चौकशी केली. जिल्हात कुठे न थांबता परत निघून जाण्यास चालकांना सांगितले. त्‍यानंतर आयशर गावातून निघून गेला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About 194 workers were transported by truck