esakal | हिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर 
sakal

बोलून बातमी शोधा

korona

एका डॉक्‍टरला मंगळवारपासून (ता.२४) सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत. कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्याने शुक्रवारी (ता. २७) हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. पुणे येथील एनआयव्ही संस्‍थेला थ्रोट स्‍वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डात शुक्रवारी (ता.२७) एका कोरोना संशयित डॉक्‍टरास दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी दाखल केलेला कोरोना संशयित डॉक्टर अकोला येथील शासकीय स्‍त्री रुग्णालयात कार्यरत आहे. यापूर्वी चार कोरोना संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

एका डॉक्‍टरला मंगळवारपासून (ता.२४) सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत. कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्याने शुक्रवारी (ता. २७) हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. पुणे येथील एनआयव्ही संस्‍थेला थ्रोट स्‍वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्याचा अहवाल दोन दिवसात येणार आहे. सध्या जिल्‍हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकामार्फत संशयित रुग्णावर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 

हेही वाचा - कोरोना: आरोग्य तपासणीनंतरच गावकऱ्यांना प्रवेश

दहा लोकांना होम क्‍वॉरंटाईन

दरम्यान, हिंगोली जिल्‍ह्यात परदेशातून आलेल्या दहा लोकांना होम क्‍वॉरंटाईन (घरात अलगीकरण) करण्यात आले आहे. त्‍यामध्ये फिलीपीन्स येथून तीन नागरिक आले आहेत. ऑस्‍ट्रेलिया दोन, कझाकिस्‍तान, सौदी अरबिया, जर्मनी येथून प्रत्येकी एक नागरिक दाखल झाला आहे. तर मालदिव येथून दोन नागरिक जिल्ह्यात आले आहेत. अंत्यत महत्‍वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनी घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी केले आहे. 


कुरुंदा येथील बंधाऱ्यात मृतदेह आढळला

कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील जलेश्वर नदीच्या बंधाऱ्यात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी (ता.२७) घडली. कुरुंदा गावाजवळील जलेश्वर नदीच्या पात्रात बंधारा उभारण्यात आला आहे. बंधाऱ्यात पाणी देखील आहे. या बंधाऱ्यात मृतदेह असल्याची चर्चा शुक्रवारी सकाळी सुरू झाली. याची माहिती पोलिसांना समजताच पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. ग्रामस्‍थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मृतदेहाची ओळख पटली

 या मृतदेहाची ओळख पटली असून कुरुंदा येथील कुशोबा भाऊराव इंगोले (वय ५५) असल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. या बाबत कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार, बीट जमादार शंकर इंगोले तपास करीत आहेत. दरम्‍यान, मयत कुशोबा भाऊराव इंगोले यांच्या पश्चात पत्‍नी, दोन मुली असा परिवार आहे.

थोरावा-खांडेगाव पाटीजवळील अपघात सात जखमी

वसमत : तालुक्‍यातील थोरावा-खांडेगाव पाटीदरम्यान आॕटो व कारमध्ये झालेल्या आपघातात सात जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२७) सकाळच्या सुमारास घडली. हैदराबाद येथून राजस्थानकडे कार (क्रमांक टी.एस.१५ ईएस २०२२) जात होती. या कारचा व वसमत येथील आॕटोचा परभणी रोडवरील थोरावा, खांडेगाव पाटी दरम्यान समोरासमोर अपघात झाला. या अपघातात ऑटो रिक्षाचा पूर्ण चुराडा झाला. 

येथे क्लिक कराकळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड

दोघांची प्रकृती गंभीर

कारही रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात गंगाबाई वाघमारे, पिराजी वाघमारे, मारोती वाघमारे, बाबू वाघमारे, मारुती झुंझुर्डे, शंकर वळसे (रा.वसमत) व राजेश भुपेंद्र (रा. हैदराबाद) हे जखमी झाले. यात दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.