जन्मठेपेचा फरारी आरोपी चार वर्षांनी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • केज तालुक्‍यातील रेडिओ स्फोट प्रकरण 
  • पुणे येथे पोलिसांनी घेतले ताब्यात 
  • केस वाढवून फिरत होता आरोपी 
     

किल्लेधारूर (जि. बीड) - रेडिओमध्ये स्फोटक साहित्य बसवून मित्रास गोवण्याच्या हेतूने केलेल्या कारस्थानात एसटी वाहकाच्या घरी स्फोट होऊन हात निकामी झाल्याची घटना सात वर्षांपूर्वी केज तालुक्‍यातील काळेगाव येथे घडली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सुटीवर गेल्यानंतर फरारी झालेल्या केंद्रेवाडी येथील बाबा ऊर्फ मुंजाबा गिरी यास पोलिसांनी चार वर्षांनंतर पुणे येथे रविवारी (ता. 24) रात्री अटक केली. डोक्‍यावरील केस वाढवून शीख समाजातील रीतीप्रमाणे तो फिरत होता. 

केंद्रेवाडी येथील बाबा ऊर्फ मुंजाबा गिरी याचे गावातील एका मित्राबरोबर बिनसले होते. त्याला संपविण्यासाठी त्याने रेडिओमध्ये स्फोटक साहित्य ठेवले होते. रेडिओ सुरू करताच त्याचा स्फोट होणार होता. हा रेडिओ त्याने मित्राच्या घरी देण्यासाठी पार्सल केले होते. हे पार्सल केंद्रेवाडी येथे जाण्याऐवजी एसटी वाहकाने घरी काळेगाव येथे नेले होते. पार्सल फोडले असता त्यात रेडिओ निघाला होता.

हेही वाचा - चक्क मृत व्यक्तीने घेतला जामीन

रेडिओ सुरू करताच स्फोट होऊन वाहकासह कुटुंबीय जखमी झाले. 2012 मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणात गिरी याचे नाव समोर आले होते. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो तुरुंगात होता; परंतु 2015 मध्ये पेरोलवर गेल्यानंतर तो फरारी झाला होता. या प्रकरणात हर्सूलच्या तुरुंग अधिकाऱ्यांनी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. तेव्हापासून तो पोलिसांना सापडत नव्हता.

हेही वाचा - मोक्का प्रकरणात 14 जणांना अटक

दरम्यान, पोलिसांना तो पुणे येथे एका कंपनीत काम करीत असल्याची माहिती मिळाली. हा जन्मठेपेतील आरोपी असल्याचा सुगावा लागल्याने पुणे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चार वर्षांनंतर त्यास अटक केली आहे. चौकशीत तो धारूर पोलिस ठाणे येथील गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. धारूर ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. बी. बनकर, श्री. राठोड, श्री. माळेकर यांनी रविवारी मध्यरात्री त्यास पुणे येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याला धारूर येथे आणण्यात आले. त्यास धारूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने औरंगाबाद येथील तुरुंगात हलविण्याचे आदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding accused arrested