चक्क मृत व्यक्तीने घेतला जामीन! 

सुषेन जाधव
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • न्यायालयाची फसवणूक
  • बनावट जामीनदार उभा करणाऱ्यास अटक 

औरंगाबाद : धनादेश अनादर प्रकरणी दाखल दाव्यात बनावट कादगपत्रांआधारे 2012 मध्ये मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावावर डमी जामीनदार उभा करून जामीन मिळवत न्यायालयाची फसवणूक केली. प्रकरणात पोलिसांनी डमी जामीनदाराला अटक केली आहे. जयकर सयाजी गडवे (56, रा. रमानगर) असे संशयिताचे नाव आहे. प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आरक्षण विभागातील वरिष्ठ सहायक शिवकुमार कावळे (41, रा. गवळीपुरा, छावणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कावळे हे 2014 मध्ये विद्यापीठातील पाली ऍण्ड बुद्धिझम विभागात कार्यरत असताना त्यांची ओळख राजू कांबळे याच्याशी झाली. कांबळेला इंटरनेट कॅफे सुरू करण्यासाठी कावळेंनी 20 ऑगस्ट 2014 ला तीन लाख रुपये दिले होते. त्यावर संशयिताने कावळेंना तीन लाखांचा धनादेश दिला. धनादेश बॅंकेत टाकला; मात्र तो वटला नाही. त्यामुळे कावळे यांनी न्यायालयात दावा दाखल केला. 

हेही वाचा - तिने देहविक्रयसाठी दिला स्वतःचा फ्लॅट, नंतर.....

प्रकरणात कांबळे हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा भाऊ विनोद, त्याची पत्नी प्रियांका व जयराम पुंजाजी खिल्लारे (रा. रमानगर) यांनी त्याचा 7 एप्रिल 2017 ला जामीन घेतला. गुन्ह्याच्या सुनावणीत संशयित हजर राहत नसल्याने न्यायालयाने जामीनदार जयराम खिल्लारे यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस काढली. पोलिस सदरील नोटीस तामील करण्यासाठी गेले असता खिल्लारे यांचा 26 जुलै 2012 लाच मृत्यू झाल्याचे समोर आले. 

 

पोलिस कोठडीत रवानगी 

प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात राजू कांबळेला सोडविण्यासाठी विनोद कांबळे, प्रियांका कांबळे, कचरू जयराम खिल्लारे व जयकर गडवे या चौघांनी मृत जयराम खिल्लारे यांच्या नावे बनावट मतदान ओळखपत्र, टॅक्‍स पावती, जामिनाच्या कागदपत्रांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी जयकर गडवे याला 22 नोव्हेंबरला उस्मानपुरा परिसरातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death person get bail in Court