नांदेड : खूनातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 13 मे 2019

गुप्त माहितीवरुन स्थानिक गुन्हे पथकांनी रविवारी रात्री त्याला विष्णुपूरी परिसरात असलेल्या भगतसिंग चौकातील एका हॉटेलवरून अटक केली. आरोपीची चौकशी करून वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले.

नांदेड : बोंढार (ता. नांदेड) शिवारात एका ट्रक चालकाचा खून करून तीन वर्षापासून फरार असलेला मंगल्या चव्हाण हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. विष्णुपूरी परिसरातून त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने रविवारी (ता. 12) रात्री अटक करुन विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले.

शहरापासून जवळच असलेल्या बायपास रस्त्यावरील बोंढार शिवारात एका ट्रक चालकास मारहाण करून त्याच्याजवळचे 32 हजार रुपये लुटले होते. एवढेच नाही तर रेल्वे उड्डाण पुलाखाली नेऊन त्याचा ता. 16 ऑक्टोबर 2016 च्या रात्री खून केला होता. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यांनतर काही तासातच या खूनाची उकल झाली. त्तकालीन पोलिस निरीक्षक सुभाष राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद दिघोरे यांनी सांगवी भागातील एका महिलेसह अन्य आरोपीना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सध्या त्या महिलेसह अन्य आरोपी कारागृहातच आहेत. त्यापैकी याच भागात राहणारा मंगल उर्फ मंगल्या ज्ञानेश्‍वर उर्फ करोडपती चव्हाण (वय 20) हा फरार होता. तो अटक होऊ नये म्हणून कर्नाटकातील बीदर, भालकी व नांदेडच्या ग्रामीण भागात वास्तव्य करीत होता. गुप्त माहितीवरुन स्थानिक गुन्हे पथकांनी रविवारी रात्री त्याला विष्णुपूरी परिसरात असलेल्या भगतसिंग चौकातील एका हॉटेलवरून अटक केली. त्याची चौकशी करून वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. विमानतळ पोलिसांनी सोमवारी (ता. 13) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. पथकात फौजदार सदानंद वाघमारे, जसवंतसिंग साहू, रमेश खाडे, बालाजी सातपुते, विजय आडे, राजू पुल्लेवार, शेख जावेद, राजू पांगरीकर आणि घुंगरुसिंग टाक यांचा समावेश होता. या पथकाचे पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि स्थागुशाचे निरीक्षक सुनील निकाळजे यांनी कौतूक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The absconding accused was arrested Nanded Local crime branch action