शिबीरांची संख्या वाढल्याने रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा 

सकाळ वृतसेवा 
Monday, 21 December 2020

परभणी जिल्ह्यात रक्तदान शिबीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शासकीय रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. पक्षीय नेते, कार्यकर्त्यांच्या रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे.

परभणी ः महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यात रक्तदान शिबीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शासकीय रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. पक्षीय नेते, कार्यकर्त्यांच्या रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीरांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील शितकपाटे देखील रिक्त झाली होती. गरजूंना देखील रक्ताचा पुरवठा करणे शक्य होत नव्हते. राज्यातच अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे सह अन्य नेतेमंडळींनी देखील जिल्हा पातळीवरील पक्ष संघटनांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. 

महापरिनिर्वाण दिनापासून झाली शिबीरांना सुरवात 
प्रामुख्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून जिल्ह्यासह शहरात रक्तदान शिबीरांना सुरुवात झाली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यात ८० हजार पिशव्य रक्तसंकलन करण्याचा निर्धार केला आहे. त्या अंतर्गत देखील रक्तदान शिबीरे घेतली जात आहेत. शिवसेनेच्या युवासेनेने देखील शिबीरांचे आयोजन केले आहे. 

संक्रमण परिषदेकडून दररोज आढावा 
राज्य रक्त संक्रमण परिषद दररोज जिल्ह्यात झालेल्या रक्तदान शिबीरांची, संकलीत झालेल्या रक्तपिशव्यांसह आयोजकांची देखील माहिती मागवत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. खासगी रक्तपेढ्या व शासकीय रक्तपेढीतील माहिती घेऊन संकलीत माहिती संक्रमण परिषदेला पाठवली जात आहे. 

हेही वाचा - परभणीत सर्वांत निचांकी तापमानाची नोंद, परभणी @ 5.6 अंश सेल्सिअस

रक्तपेढीत सहाशेवर रक्त पिशव्या 
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीस दररोज ४० ते ५० रक्तपिशव्या अनिवार्य आहेत. थॅलेसेमिया, गर्भवती माता, ॲनेमिया, अपघात आदींसाठी त्यांची अत्यंत गरज असते. महिण्यापुर्वी या रुग्णांना देखील रक्तपुरवठा करण्यासाठी रक्तपेढीला कसरत करावी लागत होती. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाता देण्याचे आवाहन केले जात होते. तेव्हाच रक्ताचा पुरवठा करता येत होता. परंतु शिबीरांच्या वाढत्या संख्येमुळे रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा नाहीसा झाला असून सहाशेवर रक्तपिशव्यांचा साठा जमा झाला आहे. 

हेही वाचा - कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध, गावकऱ्यांनी ठराव घेऊन निवडले सदस्य

प्लाझ्मा थेरपीची मागणी घटली 
जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने कमी झाला आहे. तसेच गंभीर रुग्णांचे प्रमाण देखील घटले आहे. कोरोना रुग्णांना जीवदान देणारी प्लाझ्मा थेरपीची मागणी व दात्यांची संख्या देखील आता घटली आहे. आत्तापर्यंत दहा कोरोना बाधीत व गंभीर असलेल्या दहा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यापैकी आठ जण ठणठणीत बरे झाले आहेत.  

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abundant stock of blood in the blood bank due to increase in the number of camps, Parbhani News

फोटो गॅलरी