हेल्मेट वापर वाढल्याने घटले अपघात

- अनिल जमधडे 
मंगळवार, 10 जानेवारी 2017

हेल्मट वापर हा वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी असले तरी त्याची सक्ती झाली की विरोध, हेल्मेट स्वीकारलेच तर काही काळापुरते, हे ठरलेले आहे.

राज्यातील काही शहरांत असे चित्र यापूर्वी पहायला मिळाले आहे.

हेल्मट वापर हा वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी असले तरी त्याची सक्ती झाली की विरोध, हेल्मेट स्वीकारलेच तर काही काळापुरते, हे ठरलेले आहे.

राज्यातील काही शहरांत असे चित्र यापूर्वी पहायला मिळाले आहे.

सक्तीऐवजी प्रबोधन, जागृतीवर भर दिला, महत्त्व बिंबवले तर वेगळे चित्र दिसते, हे औरंगाबादकरांनी दाखवून दिले. औरंगाबाद शहरात वाहनधारकांना हेल्मेटची सवय लागली. त्यामुळेच शहरात अपघाती मृत्यूचे प्रमाण कमलीचे घटले आहे. गतवर्षी डोक्‍याला मार लागल्याने १३३ जणांचा मृत्यू झाला होता, हेल्मेटच्या वापरानंतर हे प्रमाण ९९ वर आले. ‘हेड इन्ज्युरी’मुळे ने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे श्रेय पोलिस आयुक्तांनाच आहे. 

औरंगाबाद शहरात हेल्मेटसक्ती काही नवीन नाही. तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्णलाल बिष्णोई यांनी हेल्मेट सक्तीसाठी आटोकाट प्रयत्न केले. हेल्मेट वापरावरून पोलिस आणि दुचाकीस्वारांत दररोज वाद होत होते.

त्यातून अनेक गुन्हेही दाखल झाले. त्यावेळी सक्ती करूनही वाहनधारकांनी हेल्मेट वापरलेच नाही. बिष्णोई यांच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक आयुक्तांनी, ही मोहीम यशस्वी होत नाही, असे म्हणत हेल्मेट विषयाकडे लक्षच दिले नाही. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आव्हान स्वीकारत फसलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला हात घातला. त्यांनी सक्तीची पद्धत बदलली. हेल्मेट सक्तीचा विषय काढून सहा महिने प्रबोधन केले. ते प्रत्येक शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालयांच्या आस्थापनांत गेले. हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. राज्य, देश आणि आपल्या शहरात दुचाकी अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी सांगितली. अपघातातील संबंधित कुटुंबांवर काय परिस्थिती ओढवते, हे त्यांनी पॉवर प्रेंझेंटेशनच्या माध्यमातून सांगितले. प्रबोधनानंतर त्यांनी हेल्मेट वापराच्या कार्यवाहीसाठी फेब्रुवारी २०१६ चा मुहूर्त निवडला. त्यानंतर अगदी चमत्कार व्हावा, अशी स्थिती निर्माण झाली. शहरात पूर्वी विरोध करणाऱ्या नागरिकांनी दुकानांसमोर रांगा लावून हेल्मेट खरेदी केली. आठवडाभर ही स्थिती कायम होती. राज्यात कुठेही, कधीही हेल्मेट खरेदीसाठी रांगा लागल्या नाही, ते औरंगाबादेत घडले. ही कार्यवाही नागरिकांपपर्यंत पोचावी, यासाठी पोलिसांनी फेरीही काढली. अंमलबजावणीसाठी पोलिस फौज रस्त्यावर उतरवली. ‘आमची सक्ती असली तरी तुमची सुरक्षितता’ असे  प्रबोधन, पुढे दंडात्मक कारवाई असे करत प्रत्येक दुचाकीधारकाच्या डोक्‍यावर हेल्मेट पक्के बसेल, याची काळजी घेतली. औरंगाबादेत आता जवळपास सत्तर टक्के दुचाकीस्वार हेल्मेट नियमित वापरत आहेत.

औरंगाबादच्या यशानंतर परिवहनमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला. मात्र विविध शहरांतून झालेला विरोध लक्षात घेऊन शासनाला माघार घ्यावी लागली. 

सुरक्षेचा भाग म्हणून दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे आवश्‍यक आहे. जनजागृती करून हेल्मेट वापराचा निर्णय घेतल्याने नागरिकांना तो पटला. आता बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याने अपघाताचे प्रमाण घटले आहे. 
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, औरंगाबाद.

Web Title: accident decrease by helmet use