Accident : भरधाव 'हायवा'च्या धडकेत रिक्षातील एक जण ठार; तेरा जण गंभीर

छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील वाळु वाहतुक करणाऱ्या 'हायवा'ने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली.
Rickshaw Accident
Rickshaw Accidentsakal

पाचोड - छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील वाळु वाहतुक करणाऱ्या 'हायवा'ने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण ठार तर तेरा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता. पैठण) जवळील मुरमा फाटा येथे शुक्रवारी (ता. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून अपघातानंतर हायवा चालक वाहनासह फरार झाला.

यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड येथे बाजारपेठ असल्याने पंचक्रोशीतील नागरिक आपल्या दैनंदिन गरजू वस्तु खरेदीसाठी येथे येतात. पाचोडपासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या मुरमा व कोळीबोडखा गावांतील ग्रामस्थ गावांत बससेवा उपलब्ध नसल्याने रिक्षाने ये-जा करतात.

शुक्रवारी (ता.२६) सकाळी मुरमा व कोळीबोडखा गावांतील काही ग्रामस्थ पाचोड येथे काही कामानिमित्त आले व आपले कामे उरकून ते रिक्षा (क्र. एम.एच -२० टी- ४३९२) ने आपल्या गावी परत निघाले. त्यांचे गाव काही मिनिटाच्या अंतरावर राहीले असतांना छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या विना क्रमांकाच्या हायवाने या रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली.

यात श्रीमंतराव पांडुरंग मापारी (वय ६५),अंबादास भानुदास चिडे (वय ६०), चंपाबाई केरूबा वाडेकर (वय ५०), केरूबा रामभाऊ वाडेकर (वय ६०),अंबादास गणपत मापारी (वय ६५) हे सर्व रा.मुरमा (ता.पैठण),सोपान कानडे (वय ५५) रा.बीड, लतीफाबी शेख (वय ६५), शांताबाई गंगाराम मगरे (वय ६०),प्रल्हाद जिजा चावरे (वय ६०), बाबुराव कोंडीबा चावरे (वय ७०),अदिल रजाक टालीगर (वय २५), सुलताना शेख मोहम्मद शेख (वय ६५), हे सर्व रा.कोळीबोडखा, (ता.पैठण) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर वाहन थांबवून मदत करण्याची तसदी न घेता हायवा चालकाने घटनास्थळाहून फरार होण्यात धन्यता मानली.

ही धडक एवढी जोराची होती की प्रवाशांना घेवून जाणारा रिक्षा दुभाजकावरून पन्नास फुट दुरपर्यंत जाऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कोलांट्या उडया घेत आडवा झाला, तर त्यातील प्रवाशी कांदे -बटाटे फेकून द्यावे त्याप्रमाणे रस्त्यावर विस्तृत: विखूरले गेले.रिक्षाचा पूर्णतः चुराडा होऊन त्याचा 'टप' पन्नास फूटावर तुटून पडले.

हा अपघात पाहून हॉटेलवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्व जखमींना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या सर्व जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान श्रीमंतराव पांडूरंग मापारी (वय ६५) यांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यात सर्व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून त्यांना गंभीर दुखापती झाल्या.

मदतीसाठी अनेक रुग्णवाहीकाना पाचारण करण्यात आले, मात्र जखमीना घटनास्थळाहून हलविल्यानंतर तासभराने रुग्णवाहीका हजर झाल्या. या रिक्षातील प्रवाशांनी पाचोडहून घरी खाण्यासाठी घेतलेली फळे, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी मेजवाणीला घेतलेले मटण रस्त्यावर विखूरले गेले होते.

अपघातस्थळाजवळच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेले 'चेकपोस्ट' नाका असून तेथील पोलिसांसमोर अपघात घेऊन संबंधीत वाहन पसार होण्यात यशस्वी झाले हे मात्र काहीतरी 'काळेबेरे' दर्शविते.अपघाताची माहिती मिळताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे,भगवान धांडे,गोविंद राऊत,आण्णासाहेब गव्हाणे, विलास काकडे आदीनी भेट देऊन पाहणी केली.

वाळूची वाहने ठरताहेत यमदूत -

धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून अहोरात्र क्षमतेपेक्षा दुप्पट वाळू भरून शेकडो वाहने पोलिस, प्रादेशिक परिवहन व महसुल अधिकाऱ्याच्या नाकावर टिच्चून बिनदिक्कतपणे वाळूची वाहतूक करतात. या रस्त्याने धावणारे सर्वच वाळूचे वाहने विनाक्रमांकाची असून 'अनधिकृत उत्पन्ना' मुळे कुणीच त्यांचेवर कार्यवाही करीत नाहीत.

प्रत्येक दिवस अपघाताला निमंत्रण देणाराच उजाडतो. या रस्त्याचे चौपदरीकरण होऊनही अपघाताला चाप न बसता अपघातात वाढ झाली आहे. या रस्त्यावरून बेदरकार धावणारी वाळुची वाहने निष्पाप पादचारी व लहान वाहनधारकांसाठी यमदूत ठरली असून त्यावर अंकूश लावण्याची सर्वत्र मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com