दैव बलवत्तर, मुलगी भाग्यशाली म्हणून वाचलो!

Ramsinh
Ramsinh

औरंगाबाद - ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ अशी म्हण सर्वश्रुतच. याच म्हणीची अनुभूती संभाजी कॉलनी, सिडकोतील रामसिंह वासुदेवसिंह जाधव यांना आली. ‘‘बेफाम चालकाने तरुणाला चिरडल्याचे मला समजले. त्याच चालकाच्या कचाट्यात मीही सापडलो; पण माझे दैव बलवत्तर..माझी मुलगीही भाग्यशाली म्हणून मी वाचलो.’’ जेमतेम दीड महिन्यावर मुलीचे लग्न आलेल्या एका बापाने अशा बोलक्‍या भावना व्यक्त केल्या. 

बेफाम ट्रकचालकाने एकाचा बळी घेत पाच जणांना जखमी केले; परंतु जाधव यांच्यासोबत झोलल्या अपघाताची बाबच उजेडात आली नव्हती. ते या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. घटना त्यांच्याच शब्दांत.. सावंगी येथे इंद्रप्रस्थ लॉनवर भाच्याचे लग्न पार पडले. रात्री साडेआठनंतरची वेळ. रिक्षा नसल्याने भावाला हर्सूल येथील रिक्षास्टॅंडवर दुचाकीवरून सोडले. पत्नीला आणायला जात होतो. हर्सूल ठाण्याजवळून जाताना समोर ट्रॅक्‍टर व त्यात पाण्याने भरलेला टॅंकर होता. अचानक धाडकन आवाज आला, काही कळण्याच्या आतच ट्रॅक्‍टरमधील टॅंकर उलटला, मी फेकलो गेलो. टॅंकर दुचाकीवर पडून चुराडा झाला. मी बालंबाल बचावलो. पायाखालची जमीनच सरकली. थोडक्‍यात, मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो आणि फ्रॅक्‍चर झाले. सोमवारी ऑपरेशन असून रॉडही टाकायचा आहे. खरंच मी फार नशीबवान आहे. मत्यू डोळ्यासमोर तरळत होता; पण देवाची कृपा झाली असेच मी समजेन.’’  
मग काही खरे नव्हते..

‘माझी मुलगी प्रियांका हिचे २४ एप्रिलला लग्न आहे. त्यापूर्वी हा अपघात घडला; परंतु या अपघातात मी सुखरूप बचावलो. यासाठी मी माझ्या मुलीला भाग्यशाली समजतो. पाण्याचा टॅंकर दुचाकीऐवजी अंगावर पडला असता तर... ’’ उसासा घेत त्यांनी प्रश्‍न केला. त्यांच्या अशा शब्दांनी अपघाताची भयावहता दिसून येते.

भाऊ रामसिंह यांनी दुचाकीवरून हर्सूल येथे सोडले. त्यानंतर ते परत लग्नस्थळी जात होते. त्यांना अपघात झाल्याची बाब समजताच मी हादरलो; पण ते सुखरूप असल्याने जिवात जीव आला. आम्ही खरंच नशीबवान आहोत. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख पाठीशी उभे राहिले. त्यांच्यासह पोलिसांचेही आभार. 
- पंडितसिंह जाधव, जखमीचे भाऊ.

ट्रकचालकाला थांबण्याचे सांगूनही तो पळाला. आम्ही तातडीने रुग्णालयात गेलो. रामसिंह बालंबाल बचावले. हे पाहून दीड महिन्यावर लग्न आलेली त्यांची मुलगीही धायमोकलून रडतानाचे दृश्‍य पाहून गहिवरून आले. 
- मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com