नवविवाहित तरुणावर काळाचा घाला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

लग्नाच्या एकविसाव्या दिवशीच ट्रकच्या धडकेत मृत्यू 

औरंगाबाद - त्याच्या लग्नाला अवघे वीसच दिवस झाले. घरातील सगळेच लग्नाच्या आनंदात होते; पण दुर्दैवाने ट्रक आणि दुचाकी अपघातात त्याचा मृत्यू झाला अन्‌ एका क्षणात संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले. हा अपघात औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी (ता. सात) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कल्पेश सुभाषचंद्र कासर (वय 27, रा. अजिंक्‍यतारा सैनिक विहार, कांचनवाडी, पैठणरोड) असे मृताचे नाव आहे. कल्पेशचे वीस दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. कल्पेश शहरातील एका ट्रेडिंग एजन्सीवर कामाला होता. रात्री तो कामानिमित्त तो वाळूजला गेला होता. काम आटोपून तो दुचाकीने (एमएच-20-ईयू-4264) शहरात येत होता. त्यावेळी औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ मागून आलेल्या ट्रकने (एमपी -09- एचएच-65165) डाव्या बाजूला वळण घेतले. त्यावेळी कल्पेशच्या दुचाकीला धडक बसली. यात कल्पेश गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर त्याला नागरिकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान रविवारी (ता. आठ) पहाटे सव्वातीनच्या सुमारास कल्पेशचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ठाण्यात नेली. कल्पेशचे आत्येभाऊ डॉ. अमर राठी (रा. गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार छावणी पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण तपास करीत आहेत. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accidental death of a young man