पूर्वीच्या धोरणानुसार युतीस भाजप नाखूष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (ता.21) जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत युती सन्मानाने व्हावी, अशी भाजपची अपेक्षा आहे, मात्र ही युती पुर्वीच्या समीकरणांप्रमाणे होणार नाही; कारण आता भाजपची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व 62 गटांमध्ये तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पार्टीच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात बुधवारी (ता. 21) भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत श्री. जाधव यांनी सांगितले, केंद्रात व राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैठण आणि गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. नगरसेवकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

एकंदरित सर्वत्र भाजपची ताकद वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या संघटनात्मक कार्याबाबतचा आढावा घेतला. काही दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत, या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वच्या सर्व म्हणजे 62 गटांमध्ये कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्ष संघटन वाढावे यासाठी पक्षाकडून अशाप्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूर्वीच्या धोरणानुसार नव्हे, तर आता आमची ताकद वाढलेली आहे, त्यानुसार जर जागा सोडण्यात आल्या तरच युती होऊ शकते. अन्यथा भाजपाला श्रेष्ठींच्या सूचनेनुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्यातरी सर्व गटांमध्ये संघटन वाढविण्यासाठी म्हणून तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक गटामध्ये पक्षाकडे किमान दहापेक्षा जास्त अधिक इच्छुक उमेदवार असल्याचे श्री. जाधव यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: In accordance with the previous BJP unhappy