घरफोड्यांतील आरोपी, सराफाला विदर्भातून अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

लातूर येथील अंबाजोगाई रस्त्यावरील धन्वंतरी डॉक्‍टर कॉलनीत घरफोडी करून सात लाख 35 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफासह पोलिसांनी विदर्भातून अटक केली आहे. ही कारवाई येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. पोलिसांनी तपास करून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफाकडून सव्वा चार लाख रुपयांचे 17 तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

लातूरः येथील अंबाजोगाई रस्त्यावरील धन्वंतरी डॉक्‍टर कॉलनीत घरफोडी करून सात लाख 35 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफासह पोलिसांनी विदर्भातून अटक केली आहे. ही कारवाई येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. पोलिसांनी तपास करून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफाकडून सव्वा चार लाख रुपयांचे 17 तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील अंबाजोगाई रस्त्यावरील धन्वंतरी डॉक्‍टर कॉलनीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संजय बनसोडे यांचे घर आहे. ता. चार जुलै रोजी त्यांची पत्नी शिल्पा बनसोडे या घराला कुलूप लावून बाजारात गेल्या होत्या. घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. 

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, उपनिरीक्षक कोमवाड, अंगद कोतवाड, राम गवारे, युसूफ शेख, सदानंद योगी, रियाज सौदागर, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के असे पथक नियुक्त केले. गेल्या काही दिवसांपासून हे पथक घरफोड्या करणाऱ्याचा शोध घेत होते. यात राजू ऊर्फ शिवानंद सुभाष पवार व त्याच्या साथीदाराने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या पथकाने ता. 13 जुलै रोजी दुसरबीड (ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा) येथे जाऊन गुन्ह्यातील विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले होते. त्याने त्याचा सावत्रभाऊ राजू ऊर्फ शिवानंद पवार याच्या साथीने हा गुन्हा केल्याचे कबूल केले होते. या बालकाकडून गुन्ह्यात वापरलेली 45 हजार रुपयांची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली होती. या राजू पवार हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. 

त्याचा शोध हे पोलिस पथक घेत होते. यात हे पथक ता. सात ऑगस्ट रोजी बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात राजू पवार याचा शोध घेत होते. यात ता. नऊ ऑगस्ट रोजी या पथकास राजू पवार हा वाशीम व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर वास्तवास असल्याची माहिती मिळाली. या पथकाने वाशीम पोलिसांच्या मदतीने छापा टाकून राजू पवार याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. या चोरीतील सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारपूस केली असता त्याने हे दागिने विष्णू भगवान भुतेकर (रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) यास विक्री केले असल्याचे सांगितले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, सहायक पोलिस निरीक्षक माळी, उपनिरीक्षक नेहरकर यांनी भुतेकर याच्याकडे अधिक तपास केला. यात त्याने राजू पवार याच्याकडून सोन्याचे दागिने घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी भुतेकर याच्याकडून चार लाख 25 हजार रुपयांचे 17 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 

राजू पवार याने येथे घरफोडी करण्याच्या आधी अंबाजोगाई येथे दिवसा घरफोडी आणि देऊळगाव राजा येथे मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले आहे. राजू पवार याच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यांत घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

 

पुढाऱ्याचा विरोध 

या प्रकरणात पोलिस विष्णू भुतेकर याला ताब्यात घेण्यासाठी देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे गेले होते. त्यावेळी तेथील कॉंग्रेसच्या एका स्थानिक पुढाऱ्याने भुतेकर याला ताब्यात घेण्यास पोलिसांना विरोध केला. काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील असाच विरोध केला. तरी देखील येथील पोलिसांनी भुतेकर याला अटक करून आणली आहे. हा पुढारी लातूरपर्यंत आला होता. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर मात्र तो परत गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused in the burglary, Sarafa arrested from Vidarbha