कन्हेरवाडीत एकाचा गळफास, नातेवाइकांचा खुनाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 March 2020

कन्हेरवाडी येथील एका व्यक्तीचा गळफासाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री घडली; मात्र नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून संगनमताने खून झाल्याचा आरोप केला आहे. 

परळी वैजनाथ (जि. बीड) - तालुक्यातील कन्हेरवाडी येथील एका व्यक्तीचा गळफासाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री घडली; मात्र नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून संगनमताने खून झाल्याचा आरोप केला आहे. 

कन्हेरवाडी येथील शेतकरी दत्तू कुंडलिंक मुंडे (वय ४५) यांच्या घरी शुक्रवारी (ता. २७) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती बोलावण्यास आली. या व्यक्तीबरोबर दत्तू मुंडे घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत परत आलेच नाहीत. त्यांचा मुलगा वसंत दत्तू मुंडे यांनी आपल्या सर्व नातेवाइकांना फोन लावले. वडील आले आहेत का? असे विचारले; पण ते सापडले नाहीत.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

सकाळी लवकरच गावातील एक व्यक्ती धावत घरी आला व त्यांनी सांगितले की, शेतात वडिलांनी मोटारच्या आडूला गळफास लावून घेतला आहे. आम्ही तिकडे गेलो तर ते माझे वडील होते. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. यासंदर्भात ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलगा वसंत मुंडे यांनी फिर्याद दिली आहे, की माझ्या वडिलांचा खून करून त्यांना फाशी देण्यात आली आहे. गावातील बहिणीच्या सासरची मंडळी वडिलांना सतत त्रास देत होती; तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याचे एक पोलिसही वडिलांना त्रास देत होते. या सर्वांनी मिळून वडिलांचा खून करून फासावर लटकवले आहे. 

हेही वाचा - परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...

दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. जोपर्यंत संशयितावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका मुलगा वसंत मुंडे यांनी घेतली. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात चौकशीसाठी दाखल झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of murder in Beed district