लगट केली, पाठलाग केला, रस्त्यात अडवून हात धरला आणि...

Nanded News
Nanded News

नांदेड : हिंगणघाट, नाशिक, सिल्लोडमध्ये तरुणींना जाळून मारण्याच्या घटना ताज्या असतानाच नांदेडातही एका विद्यार्थीनीला रस्त्यात गाठून विनयभंग करून अॅसीड हल्ला करण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. 

येथील सायन्स महाविद्यालय रस्त्यावर शनिवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. भयभीत झालेल्या या विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहराच्या सायन्स महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीशी लगट करण्यासाठी एक युवक मागील काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. मात्र ती विद्यार्थीनी त्याला फटकारत असे. महाविद्यालयात येता- जाता तिचा ते पाठलाग करुन तिला भंडावून सोडत असे.

यातूनच शनिवारी (ता. २२) त्याने एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल उचलत त्या विद्यार्थीनीला रस्त्यात गाठले. तिचा जबरीने हात धरून माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणून तिचा विनयभंग केला. लग्न केलं नाहीस, तर तुझ्यावर अॅसीड टाकून तुला बरबाद करीन, अशी धमकी त्यानं दिली.

एवढ्यावरच तो थांबला नाही...तर त्यानं थापडबुक्यांनी मारहाणही केली. हा प्रकार कुणाला सांगितला, तर तुला व तुझ्या परिवाराला ठार मारून टाकीन, अशी धमकीही त्यानं दिली. 

शहरातील विद्यार्थीनी व पालकवर्गात खळबळ

घडलेला प्रकार तिने आपल्या मैत्रिणीला व पालकांना सांगितला. त्यांना जबर धक्का बसला. लगेच त्यांनी तिला सोबत घेऊन भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांना ही सविस्तर माहिती दिली.

पिडीत विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून पासदगाव (ता. नांदेड) येथील एका युवकाविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एस. के. नरवाडे करत आहेत.

या घटनेमुळे नांदेड शहरातील विद्यार्थीनी व पालकवर्गात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन व खासगी शिकवणी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com