आमदारांकडून जेवण मागणाऱ्या 'त्या' तरुणींवर कारवाई

आमदारांकडून जेवण मागणाऱ्या 'त्या' तरुणींवर कारवाई

औरंगाबाद : आमदारांकडून जेवणाची मदत मागणाऱ्या "त्या' मुलींवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियमांचा बडगा उचलला आहे. अवघ्या दोन दिवसात वसतिगृह सोडण्याचे आदेश योगिता तुरुकमाने आणि कोमल शिनगारे या विद्यार्थिनींना देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींसमोर आता जायचे कुठे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

योगिता आणि कोमल या नीट आणि सीईटीसाठी विद्यापीठातील प्रियदर्शनी वसतिगृहात राहत आहेत. बारावी मंडळाची परीक्षा होईपर्यंत 50 विद्यार्थिनींना वसतिगृहात राहता येते. याअंतर्गत जेवण आणि राहण्याची जबाबदारी शासनाने विद्यापीठावर सोपवली होती. त्या दोघींचे प्रवेश मिलिंद महाविद्यालयात आहेत. बोर्ड परीक्षा होईपर्यंतच त्यांना विद्यापीठाच्या वसतिगृहात राहता येत होते. 21 मार्चलाच त्यांची परीक्षा संपली आहे. सीईटी, नीट परीक्षा मे महिन्यात होत आहे. त्यासाठी वसतिगृहात राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी विद्यार्थिनींनी शुक्रवारी (ता. 22) विद्यार्थी कल्याण संचालकांकडे धाव घेतली. यावेळी संचालकांनी कालच्या प्रसंगाची आठवण करुन दिली. त्यावर "जेवण नाही भेटले तर, आमदारांपर्यंत गेलात, पाणी मिळाले नाही तर, जीवावरच उठाल.' असे म्हटल्याचे विद्यार्थिनींनी "सकाळ'ला सांगितले. योगिता ही नवरी (ता. केज, जि. बीड) येथील तर, कोमल ही हराळ (ता. रिसोड, जि. वाशीम) या गावची आहे. 

दहा मिनिटांत मिळाले जेवण

होळीची सुटी असल्याने गुरुवारी (ता. 21) वसतिगृहात जेवण बनलेच नाही. विद्यापीठ गेटबाहेरही हॉटेल बंदच होती. त्यामुळे काही मुलींनी झोमॅटोवरुन जेवण मागविले. काही विद्यार्थिनींनी विद्यार्थी कल्याण संचालकांना फोन केला तर नकारात्मक उत्तर आले. यानंतर काहींनी उपाशी बसणे पसंत केले. यातीलच योगिताने आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे कैफियत मांडली. आमदारांनी दहा मिनिटांतच 50 मुलींना पुरेल, एवढ्या बिर्याणीचे पार्सल विद्यापीठात पाठवले. विद्यार्थिनींनी पोटभरुन खाल्ले. विद्यार्थिनींनी त्यांचे आभार मानले. 

गेल्यावेळी मुलींना परवानगी दिली तेव्हा पाण्याचा प्रश्‍न नव्हता. दरवर्षी ठेवणे आम्हाला शक्‍य नाही. विद्यार्थिनींची जबाबदारी त्या संबंधित महाविद्यालयाची आहे. शासनाचे आम्हाला पुढील कोणतेच आदेश नाहीत. 

- डॉ. मुस्तजीब खान, विद्यार्थी कल्याण संचालक. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com